

मुंबई : आयआयटी बॉम्बेचे आयआयटी मुंबई केले पाहिजे, अशी विनंती करणारे पत्र आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना पाठवणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जाहीर केले.
ब्रिटीश वारसा सांगणारे बॉम्बे हे नाव आयआयटीत कायम असल्याबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबई भेटीत आनंद व्यक्त केला आणि बरे झाले बॉम्बे कायम ठेवले असे ते म्हणाले होते. त्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने भाजपवर हल्लाबोल चढवत मुंबईचा मुद्दा हाती घेतला. भाजपने आता मराठी माणसाची माफी मागून शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर पश्चात्ताप करावा, अशी मागणी केली. त्यावर नागपुरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बॉम्बेचे मुंबई करण्यात भाजपचा सर्वात मोठा वाटा आहे, असा दावा केला.
मुख्यमंत्री म्हणाले, भाजपचे नेते राम नाईक यांचा यात सर्वात मोठा वाटा आहे. आमच्यासाठी बॉम्बे नाही तर मुंबईच आहे. शिवाय, बॉम्बेच्या खुणा संपल्या पाहिजेत. त्यासाठी आयआयटीचे नाव मुंबई करण्यासाठी केंद्र सरकारला आपण स्वतः पत्र पाठविणार आहोत.
मुघल आणि ब्रिटीशकालीन नावे म्हणजे गुलामीचे प्रतीक असल्याचे सांगत भाजप सरकारांकडून देशभर नामांतराचा आग्रह केला जातो. अगदी शिक्षण क्षेत्रातील गुलामीच्या खुणाही पुसण्याचे आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
राज ठाकरे यांना चिमटा
काही लोक सोयीस्करपणे विसरतात की आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवले, त्या शाळांची नावेही बदलली पाहिजेत. त्या बॉम्बेचा सोयीस्करपणे त्यांना विसर पडतो. पण, मी त्याबाबत फार काही बोलणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना चिमटा काढला. मराठीचा आग्रह धरणाऱ्या राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंची मुले मात्र बॉम्बे स्कॉटीश शाळेत शिकली, हे त्यांना सूचित करायचे होते.