Punha Shivaji Raje Bhosale Movie 
मुंबई

फक्त चित्रपट नाही, महाराष्ट्राची व्यथा...! राज ठाकरेंनी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' पाहण्याचे केले जनतेला आवाहन

Raj Thackeray on Punha Shivaji Raje Bhosale Movie: या चित्रपटात राज्याच्या सध्याच्या परिस्थितीची व्यथा मांडल्याने मनसे प्रमुखांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे कौतुक देखील केले.

मोनिका क्षीरसागर

Punha Shivaji Raje Bhosale Movie latest update

मुंबई: मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' (Punha Shivajiraje Bhosale) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या समाज माध्यमावर एक पोस्ट लिहून हा चित्रपट 'खरा समकालीन' असल्याचे म्हटले असून, हा सिनेमा पाहण्याचे आवाहन देखील महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.

'पुन्हा शिवाजीराजे भोसले'; आजच्या परिस्थितीवरचा चित्रपट

राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी हा चित्रपट पाहिला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही... पण समाजातील खरी समकालीन किंवा आत्ताच्या परिस्थितीवरील चित्रपट बघायचा असेल तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला पर्याय नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

'विकास' आणि सत्ताधाऱ्यांवरील टीका

या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी सध्याच्या 'विकास' कल्पनेवर आणि सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या मते, आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल आणि 'चमत्कारदार घोषणा' म्हणजे 'विकास' अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. या तथाकथित 'विकासा'तून कोणाचा विकास होतो की नाही, हे माहित नाही; पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो, असा थेट आरोप त्यांनी केला. 'विकास' केल्यानंतर धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं जातं आणि मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस, यांना हवं तसं वापरून फेकून देण्याचं काम सत्ताधारी करतात, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे भीषण दुर्दैव अन् मराठी माणसाची घुसमट

राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील शेतकरी आणि मराठी माणसाच्या सध्याच्या दुरवस्थेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो, तर दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा 'अनास्थेने झोडपते' आणि यामुळे शेतकरी पार हतबल झाला आहे. ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो, हे 'भीषण दुर्दैव' असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागात शेतकऱ्याला जमीन विकावीच लागेल इतके जेरीस आणायचे आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं आणि त्यांच्या खाण्यावर बंधनं घालणाऱ्यांचे लाड करायचे, हे सगळं सुरू आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मराठी माणसामध्ये चीड निर्माण करण्याची गरज

राज ठाकरेंनी मराठी माणसाला आत्मपरीक्षण करण्याचे आणि या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' ; एक अस्वस्थता

या सिनेमातून महेश मांजरेकर आणि त्यांच्या टीमने ही 'चीड' आणि 'अस्वस्थता' उत्तम मांडली आहे. हा केवळ चित्रपट नसून, तो या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी, असे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले. तसेच मनसे प्रमुखांनी महाराष्ट्रातील जनतेला 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट 'जरूर पहा' असे जाहीर आवाहन देखील केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT