Raj Thackeray Gyanesh Kumar PUDHARI
मुंबई

Raj Thackeray: सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत, राज ठाकरेंची बोचरी टीका

Raj Thackeray on CEC Gyanesh kumar: राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवर निशाणा साधला आहे.

पुढारी डिजिटल टीम

मुंबई : निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी एसआयआरसह मतदार यादीशी संबंधित काही निर्णयांवर आक्षेप नोंदवल्याच्या वृत्तानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रहार केला आहे. 'ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत', अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्ट करत ज्ञानेश कुमारांवर निशाणा साधला आहे. 'गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे', असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे, अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.

यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तर उद्धव ठाकरेंनी ज्ञानेश कुमार हे पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख असून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यांनी 'हा गंभीर प्रकार असून सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा केली पाहिजे', असे मत नोंदवले आहे.

दुसरीकडे दिल्लीतील राजकीय विश्लेषकांच्या मते, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर असहमती दर्शवणारे निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांना लिहिलेले पत्र, ही स्वतःच एक असामान्य घटना आहे. असा गोपनीय पत्रव्यवहार प्रसारमाध्यमांपर्यंत कसा पोहोचला, ही माहिती कोणी उघड केली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ही पत्रे जाणूनबुजून सार्वजनिक करण्यात आली होती का?, अशी शंकाही उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT