मनसे अध्यक्ष राज ठाकरे. Pudhari News
मुंबई

Raj Thackeray : कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच : राज ठाकरे

जानेवारी २०२६मधील जाहीर सभेतील प्रेझेंटेशन केले शेअर

पुढारी वृत्तसेवा

Raj Thackeray on Sabeer Bhatia documentary : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक डॉक्युमेंट्री पोस्ट केली होती. ती डिलिट होण्याच्या आधी पाहून घ्या असं आवाहनही त्‍यांनी केले होते. आता आज त्‍यांनी गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्‍या मैत्रीसंदर्भातील डॉक्युमेंट्रीबाबत सोशल मीडियावर पुन्‍हा एकदा पोस्‍ट करत आपली भूमिका स्‍पष्‍ट केलीआहे. तसेच कोणाच्‍याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच असेही स्‍पष्‍ट केले आहे.

मी शेअर केलेल्‍या 'त्‍या' डॉक्युमेंट्रीला मिळालेल्‍या व्ह्यूजची मोजदादच नाही

राज ठाकरे यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की,गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही, असे राज ठाकरे यांनी पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे.

जानेवारीत जाहीर सभेतील मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं

थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं. त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्‍याचे राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.

... तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील

या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी. पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे, असेही राज ठाकरे यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी सरकारने उद्योगपतींच्या घशात घातल्या

आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं !, असेही राज ठाकरे यांनी म्‍हटलं आहे.

म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय

मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच. म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे.

जानेवारी २०२६ च्या सभेतील प्रेझेंटेशन पुन्‍हा एकदा बघा...

जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी या पोस्‍टच्‍या माध्‍यमातून केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT