मनसे प्रमुख राज ठाकरे.  File Photo
मुंबई

Raj Thackeray | "अचाट धनशक्‍ती विरुद्ध शिवशक्ती, अशी लढाई..." : महापालिका निवडणूक निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

'एक्‍स' पोस्‍ट करत मनसेसह शिवसेना ठाकरे गटाच्‍या कार्यकर्त्यांचे कौतूक

पुढारी वृत्तसेवा

Raj Thackeray on BMC Election Results 2026

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 'एक्स पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट)च्‍या निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे. तसेच दोन्‍ही पक्षांच्‍या कार्यकर्त्यांचेही कौतूक केले आहे.

अचाट धनशक्ती आणि सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती

राज ठाकरे यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

अपेक्षित यश मिळालं नसल्‍याचे दुःख

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई

आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच, असेही राज ठाकरे यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी

तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही, असे आवाहन करत पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया, असा निर्धारही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT