Raj Thackeray Rahul Narwekar Pudhari
मुंबई

Raj Thackeray: मराठी भाषेला रस्त्यावर सांडून....; राहुल नार्वेकरांवर राज ठाकरे संतापले, विधानसभेतील चुकीवरून वाभाडे काढले

Raj Thackeray Rahul Narwekar: आशा भोसले यांच्या निधनानंतर विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावातील कथित भाषिक चुकांवरून राज ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Raj Thackeray Rahul Narwekar: पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानंतर महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत तीव्र शब्दांत टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात शोकप्रस्ताव वाचताना राहुल नार्वेकर यांनी केलेल्या भाषिक चुका आणि उच्चारांवर आक्षेप घेतला. आशा भोसले यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली वाहताना मराठी भाषेची जपणूक आणि भाषेचे गांभीर्य अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात मराठीची चिरफाड झाल्याचा आरोप त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी विशेषतः दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख झाल्याबाबत नाराजी व्यक्त केली. इतक्या गंभीर प्रसंगी सभागृहातील कोणत्याही सदस्याने हरकत घेतली नाही, याबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. राज्याच्या सर्वोच्च विधिमंडळात अशा प्रकारच्या चुका होणे आणि त्याकडे दुर्लक्ष होणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. आमदार, खासदार आणि पक्षफोडीच्या राजकारणात राज्यातील महत्त्वाचे प्रश्न मागे पडत असल्याची टीका त्यांनी केली. मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या अस्मितेबाबतची संवेदनशीलता सत्ताधाऱ्यांमध्ये दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी विधानसभेच्या गौरवशाली परंपरेची आठवण करून देताना गणेश वासुदेव मावळणकर, दत्तात्रय काशिनाथ कुंटे, बाळासाहेब भारदे, अरुण गुजराथी आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या माजी अध्यक्षांचा उल्लेख केला. त्या तुलनेत सध्याच्या कामकाजाचा दर्जा खालावल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

मराठी भाषेची गळचेपी केवळ बाहेरील शक्तींमुळे होत नसून राज्यातील संस्थांकडूनही होत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध नोंदवला. मराठी भाषेबाबत अधिक जागरूकता आणि जबाबदारीची भूमिका राज्यातील लोकप्रतिनिधींनी घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या टीकेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा राज्य सरकारकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT