Raj Thackeray Aaditya Thackeray Birthday Banner News
मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेने लावलेल्या फलकांची सर्वत्र चर्चा होतेय. मुंबईत शिवसेना भवन आणि राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थासमोर हे बॅनर लावण्यात आले असून मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे ठाकरे गटाशी संबंधित एखाद्या फलकावर झळकले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून आणि शिवसेना- ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जूनला असतो. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी वारंवार केली जात आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू आहे. ठाकरे गट आणि मनसेचे नेतेही यावर भाष्य करत असले तरी चर्चेपलीकडे गाडी पुढे सरकलेली नाही. ठाकरे बंधू एकत्र कधी येणार हा प्रश्न कायम असला तरी मुंबईतल्या शिवसेना भवनासमोरील बॅनरची सर्वत्र चर्चा आहे.
युवा सेनेचे पदाधिकारी स्वप्निल सूर्यवंशी, हर्षल पळशीकर, रणजित कदम, प्रदीप सावंत यांनी शिवसेना भवन आणि शिवतीर्थ येथे बॅनर लावले आहेत. "आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना शुभेच्छा. आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँडच चालणार" असं या बॅनरवर लिहिलंय. यापूर्वी पुण्यातही एकाच बॅनरवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आला होता. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो झळकल्याने दोन्ही मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या आशा पल्लवित झाल्या.