मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
बारामती येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना एकमताने निवडून द्यावे अशा हालचाली सुरू होणार हे उघड आहे. त्यामुळे आता राहुरी मतदारसंघातून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय यांनीही हाच न्याय लागू व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आपण निवडणुकीच्या
मैदानात उतरण्यास इच्छुक आहोत, भाजपने आपल्याला वडिलांच्या जागी संधी द्यावी, असे विधान त्यांनी केले. भाजपमध्ये या संदर्भात काय हालचाली सुरू आहेत याचा अजून अंदाज आलेला नाही. मात्र कर्डिले यांच्या मुलाने दावा केल्याने तो मान्य करणे योग्य ठरेल. समान न्याय लावावा लागेल, असे मत एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले.
राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आणि तनपुरे घराण्याचे वारसदार एकेकाळी राज्यमंत्री असलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी लढत दिली होती. कर्डिले यांच्या निधनानंतर या जागेवर बिनविरोध निवडणूक होऊ नये तर तेथे सामना व्हावा, असा महाविकास आघाडीचा प्रयत्न राहणार आहे. राहुरी येथे एकमताने उमेदवाराला होकार देण्यापेक्षा ताकद
आजमावून पाहण्याचा विचार मविआमध्ये आहे. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर तेथील निवडणूक बिनविरोध होणार असेल तर राहुरीला वेगळा नियम लावण्यासाठी निश्चित कारणे शोधावी लागतील. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही बड्या व्यक्तींना या निवडणुकीत उतरायचे असल्याची चर्चा सुरू आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत या संबंधातील हालचालींना वेग येईल असे समजते.