

सोलापूर : अनुसूचित जमाती आदिवासी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात असलेल्या नामांकित विद्यापीठांत शिक्षण घेण्याची नामी संधी मिळणार आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अति उपेक्षित पारधी समाजातील हुशार विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी म्हणून राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने शिष्यवृत्ती योजना राबवित येत आहे.
या योजनेंतर्गत चालू शैक्षणिक वर्षासाठी 40 आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. आदिवासीच्या या शिष्यवृत्ती योजने अंतर्गत परदेशातील नामवंत विद्यापीठांत प्रवेश घेऊन तेथे शिकता येईल. अनुसूचित जमातीच्या 40 विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी राज्य शासनाच्या आदिवासी मंत्रालयाकडून ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विहित निकषांनुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास उत्पन्नाची मर्यादा ही दहा लाख रुपयांपर्यंत शिथिल करण्यात येणार असून परदेशी शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या व समकक्ष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
परदेशातील शिक्षणासाठी येणाऱ्या शैक्षणिक खर्चासाठी अमेरिकेसह अन्य देशांत (युनायटेड किंगडम वगळून) प्रतिवर्षी 1500 अमेरिकन डॉलर, व युनायटेड किंगडमसाठी 1100 जीबीपी इतकी रक्कम अनुदानाच्या स्वरूपात देण्यात येईल.