मुंबई: इसिस या दहशतवादी संघटनेच्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पुण्यातील डॉक्टर अदनान अली सरकार याला मुंबईतील विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने सहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला.
महाराष्ट्रात इसिसची विचारधारा पसरविणे, तरुणांचे कट्टरतावादीकरण करणे आणि दहशतवादी कारवायांसाठी त्यांना प्रवृत्त करण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर होता.
अदनान अली हा पुण्यातील भूलतज्ज्ञ डॉक्टर आहे. जुलै २०२३ मध्ये एनआयएने त्याला पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक केली होती. महाराष्ट्रातील इसिस मॉड्यूलचा तपास करताना त्याचे नाव पुढे आले होते. या प्रकरणात एनआयएने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी छापे टाकून अनेक संशयितांना ताब्यात घेतले होते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरतावादाचा प्रसार
एनआयएच्या तपासानुसार, आरोपी सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून इसिसची विचारधारा प्रसारित करत होता. तरुणांना इसिसच्या विचारांकडे आकर्षित करून त्यांचे कट्टरतावादीकरण करण्याचा प्रयत्न सुरू होता. ऑनलाइन गटांच्या माध्यमातून हिंसक जिहाद आणि खिलाफतसंबंधी विचारांचा प्रचार केला जात असल्याचे तपासात समोर आले होते.
याशिवाय स्फोटके तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि शस्त्रनिर्मितीशी संबंधित माहिती प्रसारित केल्याचाही आरोप होता. या माध्यमातून दहशतवादी कारवायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा एनआयएने केला होता.
इतर आरोपींच्या खटल्यावर परिणाम नाही
या प्रकरणातील अन्य आरोपींविरोधातील न्यायालयीन प्रक्रिया सुरूच राहणार आहे. अदनान अली याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्यावरील खटल्याचा निकाल लागला असला, तरी अन्य आरोपींच्या दोषाबाबत न्यायालयाने अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष दिलेला नाही.
न्यायालयात स्वतःहून गुन्ह्याची कबुली
अदनान अली याने न्यायालयात गुन्ह्याची कबुली देण्याची तयारी दर्शविली होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, वृद्ध आई-वडील, पत्नी आणि चार मुलांची जबाबदारी यांचा विचार करून आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले होते. त्याच्या कबुलीजबाबाची स्वेच्छेने पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोषी ठरवून सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली