कार्यक्रमात आजी-माजी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर. (Pudhari File Photo)
मुंबई

Pravin Darekar Advice | आपल्यात मतभेद होऊ शकतात, मनभेद नकोत!

नवनियुक्त पदाधिकार्‍यांना भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकरांचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पद कुठलेही असो त्या पदाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करणे, पक्षाची वाढ झाली का, संघटनेत सर्वांना बरोबर घेऊन पक्ष बांधणी करतोय का, हा प्रश्न स्वतःला विचारा. माजी पदाधिकारी असो,आपल्याला आवडो न आवडो शेवटी ते माझ्या कुटुंबातील आहेत, माझ्या पक्षाचे आहेत. आपल्यात मतभेद असू शकतात परंतु मनभेद असू नयेत. मागाठाणेत तशा प्रकारचे काम नवनियुक्त पदाधिकार्‍यांकडून अपेक्षित आहे, असा सल्ला भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी मागाठाणे क्षेत्रातील नवनियुक्त पदाधिकार्‍यांना दिला.

बुधवारी बोरिवली (पूर्व) येथील पाटीदार समाज हॉल येथे मागाठाणे उत्तर (वॉर्ड क्र. 3,4 व 5) व मध्य मंडळ (वॉर्ड क्र. 11 व 12) विधानसभा व वॉर्ड पदाधिकार्‍यांच्या घोषणेचा कार्यक्रम भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, उत्तर मुंबई जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, मंडल अध्यक्ष अमित उतेकर, मंडल अध्यक्षा सोनाली नखुले, मंडल अध्यक्ष अविनाश राय यांसह मोठ्या संख्येने माजी पदाधिकारी, महिला व पुरुष कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

आजी-माजी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना आ. प्रवीण दरेकर म्हणाले, आज भाजप वगळता कुठल्याही पक्षाकडे अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांची फौज सक्रिय आहे असे वाटत नाही. इतर सर्वांचे दिवे विझलेले आहेत. या देशाला, राज्याला व मुंबईला एकच आशेचा किरण हा भाजपा आहे. केंद्रात, राज्यात आपली सत्ता आहे. मुंबईतही सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे. अशा परिस्थितीत आपण लोकांना काही देऊ शकलो नाही तर जनता माफ करणार नाही. त्यासाठी नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी रचनात्मक काम करण्याची गरज आहे. पद छोटे, मोठे आहे यापेक्षा मी त्या पदाला न्याय देतो का, हा विचार करून त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला.

पक्ष कार्यक्रम देतो तेव्हा मागाठाणेतील माझा कार्यकर्ता हा पुढे असतो. कटुता न येता हे कार्यकर्ते अभेद्यपणे पक्षाचे काम करताहेत याचा अभिमान असल्याचे सांगून दरेकर म्हणाल, येणार्‍या काळात मागाठाणे विधानसभा किंवा मंडलं ही भाजपाची भक्कम बालेकिल्ला ठरतील असे काम करावे.

ठाकरे बंधूंवर शरसंधान साधत दरेकर म्हणाले, येणार्‍या निवडणुकीत मराठीचा मुद्दा, भांडणे काय आहेत ते सर्व बाहेर काढणार आहे. निवडणुका 4-5 महिन्यांवर आल्या म्हणून यांना मराठीचा पुळका आलाय. निवडणुकीत यांचे सोंग, ढोंग अक्षरशः उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. मला दोन्ही घरं नीट माहीत आहेत. दारुगोळा भरून ठेवलाय, असा इशाराही दरेकरांनी दिला.

निवडणुका जवळ आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार अशी आवई हे ठाकरे उठवतात. आपला राजकीय काळ उजाड झालाय म्हणून भावनिक विषय काढून काही करता येते का, असा त्यांचा शेवटचा प्रयत्न सुरु असल्याचा टोलाही दरेकरांनी ठाकरे बंधूंना लगावला.

माणूस कामाने मोठा होतो

दरेकर म्हणाले, माणूस कामाने मोठा होतो पदाने नाही. अनेक लोकं आहेत जी कधी आमदार, खासदार झाली नाहीत. पण त्यांचे आपण पुतळे बांधतो, हार घालतो. अण्णा भाऊ साठे आमदार, मंत्री होते का? परंतु त्यांचे नाव घेऊन अनेक जण आमदार, मंत्री होतात, कारण अण्णा भाऊ साठे यांनी काम केले. नवीन पदाधिकार्‍यांनी स्वतःचे मूल्यमापन करावे. यातून स्पर्धा करावी, मात्र ती स्पर्धा एकमेकांची तंगडी ओढणारी नसावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT