

Mumbai Kabutar Khana Row
मुंबई : मुंबईतील दादर परिसरात कबुतरखान्याजवळ आज सकाळी मोठा राडा झाला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करून ताडपत्रीने झाकले आहेत. मात्र, आज सकाळी जैन समुदायाने दादरच्या झाकलेल्या कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून आतमध्ये प्रवेश केला. प्रचंड आक्रमक घोषणाबाजी आणि पोलिसांशी हुज्जत घालण्याच्या प्रकाराने मोठा राडा झाला. यावरून आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी असाच हिंसाचार करू का? असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला असतानाच आता मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनीही यावरून सरकारवर जहाल टीका केली आहे. "तीन सत्ताधीशांनी राज्याला जैनराष्ट्र म्हणून जाहीर करावं," अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
'पुढारी न्युज'शी बोलताना दीपक पवार म्हणाले, "मुंबईत राहणाऱ्या जैनांना मराठीत बोलता येत नाही. माध्यमांमध्ये सांगितलं जात की, जैन आक्रमक झालेत, पण जैन मुळातच आक्रमक आहेत. मुंबईतील मराठी लोकांच्या जीवावर उठलेल्या जैन लोकांच कबुतरांवरील प्रेम आणि त्यातून येणारी आक्रमकता सर्व लोकांना आता दिसली आहे. पण मराठी माणसांना आपल्या इमारतीत राहू न देणं, त्यांच्या परिसरातून मराठी लोकांना हद्दपार करणं आणि शहरातून मराठी माणसांना बाहेर काढण्यात कथित अहिंसक जैनांचा मोठा वाटा असल्याचा आरोप दीपक पवार यांनी केला आहे. "कबुतरांवर प्रेम असणे स्वाभाविक आहे, पण माणसांवर प्रेम करण्यासाठी जी संवेदनशीलता लागते ती लोढा सारख्या लॅड पार्सल घेऊन फिरणाऱ्या जैनांकडे असणे शक्य नाही," अशी टीका त्यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर केली आहे.
पवार पुढे म्हणाले की, "कोल्हापूरच्या नांदणी गावातील हत्ती लोकांना न विचारता वनतारामध्ये घेऊन जातात आणि लाखो लोक मोर्चा काढतात तिथल्या शांतताप्रिय जैनांच सरकारला काही पडलेलं नाही. ती हत्तीन सरकारला परत द्यावीशी वाटत नाही. पण, कबुतरखाण्यामुळे दादरसारख्या प्रचंड गर्दी असलेल्या लोकांना श्वसनाचे रोग होत असलेल्या ठिकाणावरून सरकार लगेच बैठका घेतं. मराठी लोकांच्या जीवावर मलिदा खाऊन मोठ्या झालेल्या धनदांडग्या जैन लोकांना श्वसनाचे रोग होणार नाहीत. हे रोग सर्वसामान्य मराठी लोकांना होणार आहेत. त्यांना जर कबुतरांचा पुळका असेल, तर मुंबईतील सर्व कबुतर जैनांच्या शाकाहारी सोसायट्यांमध्ये सोडली पाहिजेत. त्यांच्यावर काय प्रेम करायचे ते करा. मुंबईतील लोकांच्या जीवाशी खेळू नका, हे सांगण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवली पाहिजे, असे पवार यांनी सरकारला ठणकावले.
यावेळी डॉ. पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर जहाल टीका केली. "महाराष्ट्रातील फक्त आडनावाने मराठी असलेले आणि आजिबात मराठीपणा शिल्लक नसलेल्या तीन सत्ताधीशांनी जाहीर करावं की, आपण जैनांचे गुलाम आहोत. आपल्याला मराठी लोकांच्या हिताचे काय पडलेलं नाही. जैनांची कबुतर ही मराठी माणसांच्या जीवापेक्षा जास्त महत्वाची आहेत. हे सरकारने जाहीर करावं. हे केलं की जैनांच्या आग्रहाखातर मुंबई शहराच आणि महाराष्ट्राचं नाव जैनराष्ट्र करणं सरकारला सोप जाईल," असे ते म्हणाले.
जे काही दादरला झाले ते आश्चर्यकारक आहे. जैन समाज कधीच हिंसाचार मानत नाही, त्यांनी जर असं काही केलं असेल तर नक्कीच त्यामागे राजकीय नेत्याचे पाठबळ असेल. त्यांनी फूस लावल्यामुळे अशी घटना घडली असेल. ज्या पद्धतीने त्यांनी कबूतर खाण्याच्या बाबतीत केलंय तसे आम्ही माधुरी हत्तीला आणण्यासाठी करायचं का? माधुरी हत्तीला आणण्यासाठी वनताराला जाऊन असाच हिंसाचार करून आम्ही तिला सोडवायचा का? असा सवाल मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
"मुख्यमंत्र्यांनी कबुतरखान्याबाबतचे निर्देश आणि आदेश स्पष्ट केलेत. त्यामुळे मर्यादित पद्धतीने कबुतरांना खायला मिळालं पाहिजे. कबुतरखाने मर्यादित फिडिंग रचनेने वाचले पाहिजेत. याचा अतिरेक न होता लोकांनाही त्रास होता कामा नये, या बद्दलची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. भावना प्रत्येकाने जरूर मांडाव्यात, आंदोलनकर्त्यांच्याही भावना आम्ही विचारात घेतल्या आहेत," असे मंत्री मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.