Sunil Tatkare News Pudhari
मुंबई

Maharashtra Politics: मी प्रॅक्टिकल राजकारणी, मला रणनीतीकाराची गरज नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासोबत गुरुवारी देवगिरी बंगल्यात सुमारे पाच तास चर्चा केल्यानंतर शुक्रवारी राजकीय क्षेत्रात सुरु झालेल्या उलट सुलट चर्चा निराधार असल्याचा दावा या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.

मी प्रॅक्टिकल राजकारणी, मला रणनीतीकाराची गरज नाही. किशोर यांना पक्षाने रणनीतीकार किंवा राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त केले असते तर नेतृत्वाने आपणास माहिती दिली असती. तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरून आपल्याला हटवण्याबाबत मीच कसे उत्तर देणार, असेही स्पष्ट केले. पक्षाच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खासदार तटकरे म्हणाले, किशोर यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. त्यांची ती केवळ सदिच्छा भेट होती. एखादी भेट झाली म्हणजे लगेच त्यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली, असा अर्थ काढणे योग्य नाही.

माझ्या आयुष्यात मी कधीही निवडणुकीचा सर्व्हे केला नाही. मी प्रत्यक्ष मैदानात काम करणारा कार्यकर्ता आहे. गावागावातील सर्वसामान्य लोक, शेतकरी आणि तरुणांना भेटल्यानंतर मतदारांचा कल सहज समजतो.

संपूर्ण राज्याचा आठ वेळा दौरा केला असल्यामुळे मला महाराष्ट्राचा कानाकोपरा माहिती आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT