मुंबई : राज्यातील नागरिकांना तातडीने उपचार मिळावे यासाठी लवकरच 1400 डॉक्टर्सची भरती केली जाणार आहे, अशी घोषणा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत केली. विशेष करून आदिवासी भागातील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि तज्ज्ञ डॉक्टर्सही नेमण्याबरोबरच त्यांचे मानधन वाढविण्याला प्राधान्य देणार असल्याचेही आबिटकर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी डॉक्टर्स आणि तज्ज्ञ डॉक्टर्सचा असलेला अभाव आणि नादुरुस्त अवस्थेत असलेल्या रुग्णवाहिकांसंदर्भात काँग्रेस आमदार राजेश राठोड यांनी विधान परिषदेत नियम 93 अन्वये चर्चा उपस्थित केली होती.
या चर्चेला उत्तर देताना मंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते. ते म्हणाले, राज्यात 1400 डॉक्टर्सची भरती केली जाणार आहे. या भरतीबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णालयांची माहिती घेऊन तेथे या सर्व नेमणुका केल्या जातील. विशेषत: आदिवासी भागातील डॉक्टर्सच्या नेमणुका करणे, डॉक्टर्सचे मानधन वाढविणे आदी गोष्टींना प्राधान्य दिले असून त्यांना गती देऊन मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री आबिटकर यांनी यावेळी दिली.
दरम्यान, 102 नंबरच्या रुग्णवाहिका या आता 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेप्रमाणे काम करतील. या रुग्णवाहिकांचा आपत्कालीन परिस्थितीतही वापर केला जाईल, असे सांगत कोणत्याही रुग्णवाहिका बंद पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तसेच रुग्णवाहिकांसाठी चालक उपलब्ध होण्यासाठी नियोजन पद्धतीने कार्यवाही केली जाईल, असेही आबिटकर यांनी स्पष्ट केले.