पालघर (ठाणे) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातिवली येथील उड्डाणपुलामुळे निर्माण झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येचे समाधान झाल्यानंतर आता महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या खड्डे बुजवण्याच्या कामामुळे महामार्गावरील खड्ड्यांची संख्या नियंत्रणात आल्याने वाहन चालकांसह महामार्गावरील प्रवाशांचा प्रवास कोंडीमुक्त झाला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी मायक्रो काँक्रीट, इपॉक्सी सोलुशन, तसेच मास्टिक या तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येत आहे.खड्डे बुजवण्याचे काम निर्मल इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी कडून युद्धपातळीवर केले जात आहे.मास्टिकच्या साहाय्याने खड्डे बुजवण्याची जबाबदारी अन्य ठेकेदाराकडे देण्यात आली आहे.
सध्या अच्छाड ते घोडबंदर या दरम्यान महामार्गावरील अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्यामुळे खड्ड्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.परिणामी, महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून, वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरून कोंडीमुक्त प्रवासामुळे अवजड वाहन चालक, रिक्षाचालक, खासगी वाहनधारक, कंपन्यांतील कामगार, प्रवासी तसेच स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्ग राज्याची राजधानी मुंबई आणि गुजरातला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.मुंबई,ठाणे आणि एमएमआर रिजन जोडला जात असल्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या मोठी आहे. वाहतूक नियोजनासह महामार्गाच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम वेळेत पार पडणे आवश्यक होते. त्यामुळे सातिवलीतील वाहतूक कोंडीचे संकट सोडविल्यानंतर लगेचच खड्डे बुजवण्यावर लक्ष केंद्रित केल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पालघर जिल्हा दौर्यानंतर सातिवली उड्डाणपुलाच्या कामामुळे महामार्गावर निर्माण झालेली वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सातिवली उड्डाणपुलावर मोठया प्रमाणात खडीचा भराव,उड्डाणपुलाच्या दोन्ही वाहिन्यांवरील सर्व्हिस रोडचे काँक्रीटीकरणाचे काम दोन आठवड्यात पूर्ण करून दहा दिवसात पूर्ण आले.
खड्डे बुजवण्यासाठी मायक्रो काँक्रीट, इपॉक्सी व मास्टिकचा वापर, निर्मल इन्फ्रा प्रोजेक्ट व शिव साई कन्स्ट्रक्शनकडून केले जात आहे खड्डे बुजवण्याचे काम. अच्छाड ते घोडबंदर दरम्यानच्या महामार्गावरील खड्ड्यांची संख्या नियंत्रणात आल्याने वाहनचालक व प्रवाशांमध्ये समाधानाची भावना