

मुंबई - अहमदाबाद महामार्ग जीवघेणा ठरू लागला आहे. वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुमारे सहाशे कोटी रुपये खर्चाचा घाट घालता असताना, महामार्गावर अपघातांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. ठेकेदाराकडून र महामार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने अपघतांसह बळींची संख्या वाढत आहे.
गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत महामार्गावर झालेल्या अपघातात चार जण ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे महामार्गावर दुचाकीस्वार आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सुभाष अमृत वड (वय २५) आणि स्वप्नील परब (वय २०) अशी मयत दुचाकीस्वारांची नावे आहेत. मंगळवारी (ता. १२) रात्री एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीला अज्ञात कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला होता. तर भावेश गणेश दांडूळे (वय २८) राज सत्रु मिश्रा (वय १९) दोघेही (रा.मान ) गंभीर जखमी झाले आहेत.
पाच दिवसांपूर्वी मुंबई अहमदाबाद महामार्गावर निर्माणाधीन असलेल्या सातिवली उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडवरील डांबरमिश्रित खडीवर दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात अज्ञात ट्रकखाली चिरडून दुचाकीवरील दांपत्याचा मृत्यू झाला. जव्हारच्या देहेरे गावातील चंद्रकांत सुतार (वय ३२) आणि लक्ष्मी चंद्रकांत सुतार (वय २९) बोरिवली येथून जव्हारला जात असताना अपघात झाला होता.
बुधवारी दुपारी दुर्वेस गावाच्या हद्दीतील हेरिटेज कंपनीसमोर विरुद्ध दिशेने सुरू केलेल्या वाहतूकीसाठी गुजरात वाहिनीवर ठेवण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे झालेल्या अपघातात तीन वाहने एकमेकांना धडकून अपघात झाला होता. विरुद्ध दिशेने वाहतूक सुरु करताना थातूरमातुर उपाययोजना करून वाहन चालकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे.
सातिवली उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडवर झालेल्या अपघाताला पुलाची उभारणी करणारा ठेकेदार जबादार असल्याचा आरोप सातिवली ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा जाधव यांनी केला आहे. उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करताना नवीन डांबरी सर्व्हिस रोड तयार करण्याऐवजी ठेकेदाराने व्हाईट टॉपिंग दरम्यान निघालेली डांबर मिश्रित खडी टाकून सर्व्हिस रोड तयार केला होता. सर्व्हिस रोडवर टाकलेल्या खडीवर दुचाकी घसरल्याने अपघात झाला होता. हालोली पाटील पाडा भागात भिवंडीकर ढाब्या समोर महामार्गाच्या गुजरात वाहिनीचे काम अपूर्ण आहे.
भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन वर्षभराचा कालावधीत पूर्ण झाला आहे. परंतु महामार्गाच्या तिसऱ्या मार्गीकेच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. दोन मार्गीका असल्यामुळे रस्ता अरुंद असून त्याच भागातील नाल्यावर पूलाचा कठडा आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे दोन वाहने एकावेळी जाऊ शकत असताना वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाय योजना करण्यात आल्या नाहीत.
महामार्गावरील अपघात रोखने तसेच वाहनचालकांच्या सुरक्षेसंदर्भात महामार्गावर आवश्यक सुधारणा करण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वेळोवेळी सूचना आणि पत्र व्यवहार करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे वाहनचालक चांगलेच धास्तावले असल्याचे मत नागरिक वर्तवत आहेत.
सातिवली उड्डाणपूलाच्या सर्व्हिस रोड तयार करण्याचे निर्देश ठेकेदाराला देण्यात आले आहेत. महामार्गावर अपघात रोखण्यासह वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जातील.
सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण