

पालघर ः मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजराती पाट्या विरोधात मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.मनसेच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी पालघर तालुक्यातील हालोली गावाच्या हद्दीतील दोन हॉटेलच्या आवारात आंदोलन करीत गुजराती पाट्याची तोडफोड केली.दुसरीकडे रस्ते आस्थापना शाखेच्या पदाधिकार्यांनी चारोटी भागातील हॉटेल मालकांना समज दिली, त्यानंतरकाही हॉटेल मालकांनी गुजराती भाषेतील पाट्या काळ्या रंगाच्या प्लास्टिक कपड्याने झाकून ठेवल्या.राज्यात हिंदी सक्तीला विरोध सुरु असताना मीरा रोड झालेल्या राड्या नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा रोडमध्ये सभा घेत मराठी भाषेबाबत आक्रमक भूमिका घेतली होती.
मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या गुजरातीकरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच मनसेचे पालघर जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी सक्रिय होत महामार्गावरील गुजराती भाषेत पाट्या असलेल्या हॉटेल विरोधात आंदोलना भूमिका घेतली. येत्या आठवडा भरात मराठी पाट्या न लावल्यास खळखट्याक आंदोलनाचा इशारा रस्ते आस्थापना शाखेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पाटील यांनी दिला आहे.
महामार्गावरील हालोली येथिल आंदोलनात मनसेचे सुनील राऊत, संदीप किणी,निशांत धोत्रे, मंगेश घरत आणि कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. चारोटी भागातील आंदोलनात रस्ते आस्थापना शाखेचे ज्ञानेश पाटील याच्या नेतृत्वात करण्यात आले.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील घोडबंदर ते अच्छाड पर्यंतच्या बहुतांश हॉटेलांच्या पाट्या गुजराती भाषेत असल्यामुळे महामार्गावरून पालघर जिल्ह्यात प्रवेश करताना गुजरातमध्ये आल्याचा भास होत आहे.महामार्गा लगतच्या मीरा रोड मध्ये हिंदीच्या सक्ती विरोधात आंदोलने होत असताना महामार्गाच्या गुजरातीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गुजराती पाट्याविरोधात पालघर जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालया कडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.तसेच मराठी भाषेचा कैवार घेणारी मनसे गुजराती पाट्याविरोधात भूमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महामार्गाच्या गुजरातीकरणा बाबत खासदार शरद पवार यांच्या सह अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.मराठी भाषेतील पाट्या लावणे बंधनकारक असताना गुजराती पाट्या लावणार्या हॉटेलांवर कारवाई बाबत प्रश्न उपस्थित केला जात होता.