Hindi Language Compulsion
मुंबई : हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, या मुद्यावरुन पुढील आठवड्यात मुंबईत निघणार्या सर्वपक्षीय मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. तशी सूचक पोस्ट ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी X वर केली आहे. 'महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!' असे राऊत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूचा एकत्र मोर्चा निघणार असल्याचे संजय राऊत यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या लढ्याचे नेृत्तत्व ठाकरेंनाच करावेच लागेल. वेगळे मोर्चे निघणे बरे दिसत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले असून तसा राज ठाकरेंचा मला फोन आला. राज ठाकरेंच्या फोननंतर मी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंनीदेखील एका मोर्चाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
मराठी माणसांमध्ये कोणतीही फूट नाही. ठाकरे बंधू मनाने एकत्र आलेलेच आहेत, असेही त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे. मोर्चासाठी सकाळी १० ची वेळ सोयीची नाही. यामुळे वेळत बदल होईल. पण आम्ही सर्वजण या मोर्चात सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
हिंदी सक्तीविरोधात आयोजित केलेल्या ५ जुलैच्या मोर्च्यात सहभागी व्हावे, असा फोन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एका नेत्याला केल्याचे समजते. मराठी माणसाचा हा मुद्दा आहे, त्यावर एकत्रित लढा देवू, असा निरोप राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या विश्वासू साथीदाराला शुक्रवारी दिला. हा विश्वासू नेता संजय राऊत असावेत अशी चर्चा आहे. राज आणि उद्धव या दोघांशीही राऊत यांचे चांगले संबंध आहेत. ५ जुलैची तारीख बदलण्यामागचे कारणही ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेली विनंती असल्याचे मानले जाते.
राज ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत हिंदी सक्तीविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालणार नसल्याचे सांगत ६ जुलै रोजी मनसेचा मोर्चा निघेल, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. या मोर्चामुळे सरकारला धडकी भरेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात हिंदी सक्ती लादू देणार नसल्याचा इशारा दिला. मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली त्रिभाषा सूत्रविरोधी समन्वय समितीनेही ७ जुलै रोजी मोर्चा निघणार असल्याचे जाहीर केले. हिंदी सक्ती विरोधातील आंदोलनात सर्वांनी पक्षभेद विसरुन सहभागी होण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या मोर्चाची तारीख बदलून ६ जुलैऐवजी ५ जुलै अशी केली. त्यांनी या मुद्यावरुन एकच मोर्चा निघावा, अशी भूमिका स्पष्ट केली. याबाबत उद्धव ठाकरेंच्या नेत्यांशी आमचे चर्चा करतील. उद्धव ठाकरे यांनीही या मोर्चात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत मी त्यांच्याशी बोलणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते.