Hindi Language : त्रिभाषा सूत्रावर सरकार ठाम

शिक्षणमंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषदेत माहिती
Education Minister Dada Bhuse
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे Pudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकविण्यास विरोध होत असला तरी राज्य सरकार आपल्या निर्णयावर अजूनही ठाम आहे. तिसर्‍या भाषेसंदर्भात राज्य सरकारने कोणतीही सक्ती केलेली नसून त्यासंदर्भात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी निर्णय घ्यायचा आहे, याचा पुनरुच्चार करत पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसर्‍या भाषेचे शिक्षण हे मौखिक स्वरूपात दिले जाणार आहे. त्यासाठी कोणतेही विशिष्ट पुस्तक नसेल. पण इयत्ता तिसरीपासून पुस्तके, लिखाण, अध्ययन सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी दिली.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा आधार घेत राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून अभ्यासक्रमात तृतीय भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारकडून अप्रत्यक्षपणे हिंदीचीच सक्ती होणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेससह विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांनी हिंदी सक्तीला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री भुसे यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन तृतीय भाषेविषयीची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार कोणतीही एक तृतीय भाषा स्वीकारण्याचे राज्य सरकारवर बंधनकारक नाही. सरकारने यापूर्वी तृतीय भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार केला होता. त्यानुसार शिक्षकांसाठी प्रारूप पुस्तक तयार करण्यात आले होते. हिंदीला विरोध झाल्याने आपण पुस्तकाचा निर्णय स्थगित केला. आता पहिलीचे विद्यार्थी तृतीय भाषा म्हणून जी भाषा निवडतील त्यांना त्या भाषेचे दुसरीपर्यंत मौखिक शिक्षण दिले जाईल. त्यासाठी कोणतेही विशिष्ट पुस्तक नसेल. पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार नाही. मात्र तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक, अभ्यासक्रम आणि परीक्षा असेल, अशी माहिती भुसे यांनी दिली. राज्य मंडळाच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांखेरीज इतर भाषिक शाळांमध्ये अनेक वर्षापासून त्रिभाषा सूत्र सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशातील उच्च शिक्षणात श्रेयांकन पद्धत स्वीकारण्यात आली आहे. आता देशपातळीवर ही पद्धत सुरू करण्यात आली आहे. केवळ परीक्षेतील गुणांवर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन न होता अन्य क्रीडा, कला, कौशल्य विषयातील गुण विचारात घेतले जाणार आहेत. या स्पर्धेत आपले विद्यार्थी मागे पडू नयेत यासाठी पहिलीपासून तृतीय भाषेचा समावेश करण्याचा निर्णय झाल्याचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईत इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक शाळा

मुंबई परिसरात साधारण 4 हजार 85 एकूण शाळा असून 18 लाख 9 हजार 576 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसाठी 56 हजार 885 शिक्षक आहेत. मात्र, या शाळांच्या संख्येत सर्वाधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. मुंबईत 2121 इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून त्यापाठोपाठ मराठीच्या 930, हिंदी 474, उर्दू 377 आणि गुजराती माध्यमाच्या 107 शाळांचा समावेश असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news