नवी मुंबई : डाळिंबाची फळ बाजारात आवक घटली आहे. मात्र ग्राहकांकडून मागणी कायम आहे. त्यामुळे दरांत मोठी वाढ झाली आहे. सध्या घाऊक बाजारात डाळिंब 200 ते 250 रुपये प्रतिकिलो दराने, तर किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या डाळिंबासाठी ग्राहकांना 300 ते 400 रुपये प्रतिकिलोला मोजावे लागत आहेत.
डाळिंब हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ मानले जाते. त्यामुळे वर्षभर बाजारात त्याला मागणी असते. विशेषतः उन्हाळ्यानंतर आणि पावसाळ्याच्या आधी डाळिंबाची मागणी वाढलेली असते. मात्र सध्या डाळिंबाचा हंगाम संपत चालल्याने बाजारात येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी मागणी आणि पुरवठ्यातील तफावत वाढून दरांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे.
सध्या सांगोला, फलटण, पंढरपूर, अकलूज आणि आसपासच्या भागांतून मर्यादित प्रमाणात डाळिंबे बाजारात दाखल होत आहेत. याशिवाय गुजरात व राजस्थानमधूनही काही प्रमाणात डाळिंबांची आवक होत असली तरी ती बाजारातील मागणी पूर्ण करण्यास अपुरी ठरत आहे. त्यामुळे घाऊक बाजारातच डाळिंबाचे दर वाढले असून किरकोळ बाजारात ती आणखी महाग झाली आहेत.
पावसाळ्यापर्यंत दर चढेेच राहणार
व्यापाऱ्यांच्या मते, पावसाळा सुरू होईपर्यंत डाळिंबांची आवक वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्याचे दर आणखी काही काळ कायम राहतील, तसेच त्यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यानंतर नवीन हंगाम सुरू झाल्यावरच डाळिंबाच्या दरात काहीशी घट होण्याची शक्यता आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी डाळिंब 60 ते 100 रुपये प्रतिकिलो होते. आता दर 200 ते 250 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात मोठ्या आणि चांगल्या प्रतीच्या डाळिंबासाठी 300 ते 400 रुपये प्रतिकिलो दर आकारले जात आहेत.