मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) पदविका अभ्यासक्रमातील ‘आय’स्कीम अभ्यासक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रातील विषय उन्हाळी सत्र 2026 च्या परीक्षेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे या सत्रांमध्ये अनुतीर्ण झालेले, एटीकेटी असलेले किंवा अनेक वर्षांपासून परीक्षा प्रलंबित असलेले विद्यार्थी आता जुन्या ‘आय’ स्कीमच्या विषयांमध्ये परीक्षा देऊ शकणार नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या नव्या ‘के’ स्कीम अभ्यासक्रमातील समतुल्य विषयांमध्येच परीक्षा द्यावी लागणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने राज्यातील तंत्रनिकेतन शिक्षण संस्थांमध्ये ‘के स्कीम’ ही नवीन अभ्यासक्रम रचना शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून लागू केली आहे. या स्कीमअंतर्गत पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला असून, बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत विषय, कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोन यावर भर देण्यात आला आहे. या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आता जुन्या ‘आय’ स्कीममधील पहिल्या व दुसऱ्या सत्रातील पद्धत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘आय’ स्कीम ही 2026 नंतर टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आलेली अभ्यासक्रम रचना होती. या अंतर्गत तंत्रशिक्षण पदविका शिक्षणात सेमिस्टर पद्धत, अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण आणि विषयांची पुनर्रचना करण्यात आल्याने अभ्यासक्रम सुधारणा प्रक्रियेअंतर्गत पहिली दोन सत्रे बंद करण्यात आली आहेत. हा बदल फक्त नवीन विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून, ‘आय’ स्कीममध्ये नापास होऊन अडकून राहिलेल्या जुन्या विद्यार्थ्यांनाही लागू राहणार आहे. त्यामुळे इंग्रजी, बेसिक सायन्स, बेसिक मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, अप्लाइड मॅथेमॅटिक्स, इंजिनियरिंग ड्रॉईंग, सी प्रोग्रामिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्सटाईल, फूड टेक्नॉलॉजी, प्रिंटिंग, मायनिंग, केमिकल, फॅशन अँड अपॅरल आदी विषय ‘के’ स्कीममधील नव्या विषयांशी समतुल्य करण्यात आले आहेत.
मंडळाने यासंदर्भात आपल्या संकेतस्थळावर पहिल्या व दुसऱ्या सत्रासाठी विषयनिहाय स्वतंत्र याद्या प्रसिद्ध केल्या असून, त्यामध्ये जुना विषय, त्या ऐवजी लागू होणारा नवा विषय व संबंधित कोर्स कोड स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना जुन्या विषयाऐवजी नव्या विषयाचीच नोंद करावी लागणार आहे.
अभ्यासक्रम बदलल्यामुळे प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न, गुणांकन पद्धत आणि अभ्यासघटकांमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांनी नव्या अभ्यासक्रमानुसार तयारी करावी, असे आवाहन तंत्रशिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. तशा सूचनाही संस्था तसेच राज्यातील प्राचार्यांना केल्या आहेत, असे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले