

मुंबई : भाजपा - शिवसेनेच्या शिवतीर्थावरील सभेत हिंदुत्वाचा गजर दिसून आला. सभेच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजातील जागो तो हिंदू एक बार जागो रे, हे गीत आणि जय श्रीरामचा गजर सुरू होता. या सभेला उत्तर भारतीया उपस्थिती सर्वात लक्षणीय होती.
ज्या ठिकाणी उद्धव आणि राज ठाकरे यांची शिवशक्ती सभा झाली. त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी महायुतीची सभा झाली. सभेच्या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे कटआउट लावण्यात आले होते. सभा सुरू होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजातील ‘जागो तो एक बार हिंदू जागो रे’, हे रा. स्व. संघ प्रणित कट्टर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये गायले जाणारे गीत वाजविले जात होते. सोबतच एकनाथ शिंदे यांच्यावरील जणांसाठी राब राबतो, हे गीत देखील वाजविले जात होते.
बसमध्ये बसून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते गळ्यात भगवी उपरणे घालून शिवतीर्थावर दाखल होत होते. सभेला आठ वाजता सुरुवात झाली. मोजकीच भाषणे झाली. सभेला सर्वाधिक आणि सामान्य उत्तर भारतीयांची लक्षणीय उपस्थिती होती. सर्व भाषणे मराठीत झाली. पण जादातर श्रोते अमराठी आणि वक्ते मराठी अशी स्थिती असल्याने सभेत भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद कमी होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्याविषयी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, तुम्हाला कंटेनर हवे आहेत म्हणून तुम्ही उद्योगपतींवर टीका करत आहात, असा हल्ला चढविला. मात्र, त्यावर समोरून काहीच प्रतिसाद न आल्याने तुम्हाला कळाले नाही वाटते, असे शिंदेंनी सांगत विषय बदलला.
सभेच्या ठिकाणी उपस्थितांना नाश्ता आणि पाण्याची सोय करण्यात आली होती. टिपटॉप या ठाण्याच्या ब्रॅण्डचे फूड पॅकेट जागोजागी ठेवण्यात आली होती. काल ठाकरे बंधूंच्या सभेची सुरुवात ही ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताने करण्यात आली होती.युतीच्या सभेची सुरुवातही याच महाराष्ट्र गीताने झाली.