Mumbai Municipal Corporation (File Photo)
मुंबई

Plastic Free Mumbai: प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी महापालिकेची पुन्हा मोहीम; दुकानदारांवर ५ ते २५ हजारांचा दंड

२६ विभागांत भरारी पथके नियुक्त; प्लास्टिक पिशव्या आढळल्यास तात्काळ कारवाई, नागरिकांवरही दंडाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहरात वाढलेला प्लास्टिक पिशव्यांचा वापर लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका पुन्हा प्लास्टिक मुक्त मुंबईसाठी मोहीम हाती घेणार आहे. प्रत्येक विभाग कार्यालयनिहाय भरारी पथक स्थापन करण्यात येणार असून ही पथके मार्केट व दुकानांची अचानक तपासणी करणार आहेत. दोषी असलेल्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

या मोहिमेसाठी मुंबई महापालिकेच्या 26 विभाग कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नेमण्यात येणार आहे. हे भरारी पथक मार्केट व दुकानदारांची जाऊन अचानक पाहणी करणार आहे. यात प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

प्लास्टिक पिशव्या वापरणारा दुकानदारांना कोणतीही सवलत न देता त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. पदोपस व मार्केटच्या बाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदारांकडे प्लास्टिक पिशव्या किती प्रमाणात सापडल्या त्यावर 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यानंतरही प्लास्टिकचा वापर सुरू राहिल्यास व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या

नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत आहेत. त्यामुळे नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात अडथळा येतो. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल अशा विविध वस्तू व अन्य कचरा नाल्यांमध्ये किंवा गटारांमध्ये टाकू नये, असे आवाहन करण्यात येते. पण मुंबईकरांकडून हे गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी पुन्हा कारवाई घेण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

...तर नागरिकांवरही होणार कारवाई

प्लास्टिक पिशव्या वापरून नका, असे आवाहन भिंती पत्रक जाहिरातिच्या माध्यमातून नागरिकांना केले जाते. परंतु नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करण्यासंदर्भात महापालिका विचार करत आहे. नागरिकांवर कारवाईचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांना प्लास्टिक पिशव्या वापरू नये अशी ताकीद देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

असा असणार दंड (रुपयांत)

पहिला गुन्हा - 5 हजार

दुसरा गुन्हा - 10 हजार

तिसरा गुन्हा - 25 हजार

दंड न भरल्यास कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT