मुंबई : भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एका मुलाखतीत थेट प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्याचे सांगितले. मात्र, आता आपल्या वक्तव्यावरून त्यांनी यू-टर्न घेतला आहे. ते म्हणाले, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत, अशी चुकीची माहिती एका वरिष्ठ पत्रकाराने मला दिली होती. मात्र, मी कुठलीही अधिकृत माहिती घेतल्याशिवाय एका मुलाखतीत यासंदर्भात वक्तव्य केले. पण, माझी माहिती चुकीची असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे, असे म्हणत पीयूष गोयल यांनी घडल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिले. तसेच, या चुकीच्या माहितीबद्दल मी खेद व्यक्त करतो, असेही गोयल यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची थेट माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पटेल यांच्या निवडीवरून थेट टीका करत भूमिका मांडली होती.
राष्ट्रवादी काँग्रेससारख्या अस्सल मराठमोळ्या, रांगड्या मातीतील पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा कोणीही पाटील असावा पण पटेल नसावा, असे परखडपणे मांडले होते. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियातून राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन केले.
दरम्यान, माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानंतर आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही आपले स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीचे वृत्त त्यांनी फेटाळले, तर अजित पवारांच्या पश्चात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे बोट दाखवले होते.