Mumbai Pigeon Feeding Row, illegal zones in Dadar
मुंबई : मुंबई महापालिकेने घातलेली बंदी उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवल्याने दादर येथील कबुतरखाना ताडपत्रीने बंदिस्त केला आहे. मात्र आता दादरमधील काही ठरावीक इमारतींच्या टेरेसवर नवीन कबुतरखाने तयार झाले आहेत. काही नागरिकांनी कबुतरांना टेरेसवर दाणापाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे दादरकरांच्या आरोग्याशी खेळ सुरूच आहे. त्यामुळे ही मुजोरी महापालिका रोखणार का, असा सवाल दादरकरांनी केला आहे.
सध्या रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणापाणी घालणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, याची भीती न बाळगता काही समाजातील नागरिक नवनवीन युक्त्या लढवत कबुतरांना धान्य टाकत आहेत.
काही दिवसांपूर्वी लालबाग येथील एका नागरिकाने गाडीवर ट्रे बसवून त्यात धान्य टाकून कबुतरांना खाऊ घातले होते. विशेष म्हणजे ही गाडी दादर येथील कबुतर खान्याजवळच लावण्यात आली होती. यावेळी स्थानिकांनी जोरदार विरोध केल्यानंतर महापालिकेने या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली. त्याशिवाय त्याला तेथून हाकलून देण्यात आले. आता दादरमधील काही ठरावीक इमारतींच्या गच्चीवरच कबुतरांना दाणे टाकले जात आहेत.
दादर कबुतरखान्यापासून जवळच असलेल्या जैन मंदिर व आजूबाजूच्या जुन्या इमारतींच्या गच्चीवर हे नवीन कबुतरखाने तयार झाले आहेत. या इमारतींची गच्ची व आजूबाजूचा परिसर हजारो कबुतरांनी गजबजलेला दिसत आहे. हा प्रकार अनेकांनी मोबाईलमध्ये बंदिस्त करून त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवरही प्रसारित केले. त्यामुळे ही मुजोरी उघडकीस आली आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत दादर परिसरातील अनेक नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयात संपर्क करून याबाबत माहिती दिली आहे. महापालिकेच्या 1916 हेल्पलाइनवरही तक्रार नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता महानगरपालिका कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागून आहे.
कबुतरप्रेमींना भीती उरली नाही का?
कबुतरप्रेमींना न्यायालयाचीही भीती उरली नाही का, असा सवाल आता दादरकरांकडून केला जात आहे. बंदी असतानाही दाणे टाकणे सुरूच राहिले तर, नाईलाजाने स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून कबुतर प्रेमींना धडा शिकवतील. त्यामुळे महापालिका व पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाई नाही तर, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करावा तसेच न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना अटक करावी अशीही मागणी होत आहे.
दंडात्मक कारवाईसह गुन्हाही दाखल करणार
एखाद्या इमारतीच्या गच्चीवर अशा प्रकारे धान्य टाकण्यात येत असेल तर त्याची माहिती मिळणे अशक्य असते. याबाबत कोणी तक्रार केल्यास त्यावर कारवाई करणे शक्य होईल. दादर जैन मंदिर परिसरातील इमारतीच्या गच्चीवर धान्य टाकल्याचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आले आहेत. त्याशिवाय स्थानिक नागरिकांनीही तक्रार केली आहे. त्यामुळे हे धान्य कोणी टाकले याचा शोध घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाईसह वेळ पडल्यास पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात येईल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.