

मुंबई : दादरचा कबुतरखाना ग्रेड-2 वारसा संरचना म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती आता समोर येत असून ही ढाल पुढे करून सध्या बंदिस्त असलेला हा कबुतरखाना वाचवण्याच्या हालचाली गतिमान होऊ शकतात.
महापालिकेतील कबुतर लॉबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दादरचा ग्रेड-2 वारसा संरचना म्हणून जाहीर असल्याने हा कबुतरखाना हेरिटेज कमिटीच्या परवानगीशिवाय हटवणे अशक्य आहे. एवढेच काय तर हेरिटेज रूप असलेल्या या कबुतरखान्याचा पुनर्विकासही करणे अशक्य आहे.
दादरच्या या कबुतरखान्याचा 92 वर्षाचा इतिहास आहे. मुंबईत पहिला कबुतरखाना 1933 मध्ये दादर येथे तयार करण्यात आला. त्यामागे त्यावेळीतरी काही धार्मिक भावना नव्हत्या. गेल्या काही वर्षात कबुतरांचे नाते जैन धर्मियांशी जोडले गेले आणि त्यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये कालांतराने ठिकठिकाणी कबुतरखाने तयार होत गेले. जैन धर्मियांनी धार्मिकतेची जोड देत कबुतरांना मोठ्या प्रमाणात दाणे घालण्यास सुरुवात केली.
कबुतरे बनली आळशी
मुंबई शहर व उपनगरात अनेक प्रजातीचे पक्षी आहेत. हे पक्षी स्वतःचे अन्न स्वतः शोधून खातात व आपले जीवन जगत असतात. कबुतरही पूर्वी आपले अन्न आपणच शोधत होते. पण कबुतरांना धार्मिकतेमध्ये अडकवल्यामुळे त्यांना आयते अन्न मिळू लागले. त्यामुळे ते पूर्णपणे आळशी बनले.
कबुतरखान्याच्या वाढत्या संख्येमुळे कबुतरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आणि ही कबुतरे आरोग्याच्या दृष्टीने मुंबईकरांना घातक ठरू लागली आहेत. अलिकडेच केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांचाही ताजा अहवाल आला. आणि कबुतरांपासून मानवी आरोग्याला धोका असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. यासंदर्भातील वैद्यकीय अहवालाच्या आधारेच न्यायालयाने हे कबुतरखाने हटवण्याचे आदेश दिले आहेत.