मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राबविण्यात येणार्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होऊन त्यांच्या दुसर्या फेरीची प्रक्रियाही सुरू झाली असताना औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणी प्रक्रियेला सलग पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी आहे.
पीसीआयकडून मान्यता देण्याचे प्रकरण सुरू आहे. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची वेळ आली तरी अद्यापही अनेक महाविद्यालयांना मान्यता देण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या मान्यतेच्या प्रकरणामुळे सीईटी कक्षाकडे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याशिवाय पर्याय नसल्याने आतापर्यंत या अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीसाठी पाच वेळा मुदतवाढ देण्याची वेळ सीईटी कक्षावर आली आहे.
आतापर्यंत 55 हजारहून अधिक विद्यार्थी नोंदणी केली आहे, अगोदरच्या वेळापत्रकानुसार प्रथम मुदतही 14 जुलै होती. त्यानंतर 21 जुलै, 28 जुलै, 5 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 19 ऑगस्ट अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सुरू असलेली विलंबाची मालिका यंदाही कायम आहे. यंदा औषधनिर्माणशास्त्र प्रवेश प्रक्रियेत वारंवार होणार्या तारीख वाढीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. एकूण प्रवेश वेळापत्रक लांबत असून, शैक्षणिक सत्र सुरू होण्यासही उशीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी देखील बी. फार्मसीच्या प्रवेशासाठी अशीच विलंबाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज निवड आणि प्रवेश निश्चित करण्यासाठी कमी वेळ मिळाला होता
वाढीव मुदतीनुसार औषधनिर्माणशास्त्र प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 19 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरून कागदपत्रे सादर करता येतील. ऑनलाईन पद्धतीत निवड केलेल्या ई-स्क्रुटनी उमेदवारांना केंद्रावर प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही, तर त्यांचे अर्ज व कागदपत्रे ऑनलाईन पडताळणी करूनच पुष्टी केली जाईल.
चुक आढळल्यास उमेदवाराच्या लॉगिनवर अर्ज परत पाठवून दुरुस्तीसाठी सूचना दिली जाईल. शारीरिक पडताळणी पर्याय निवडणार्या उमेदवारांनी मात्र ठरलेल्या वेळेनुसार केंद्रावर जाऊन अर्जाची पुष्टी करणे आवश्यक आहे.