

मुंबई : महामुंबईत आतापर्यंत अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पाच फेरी पूर्ण झाल्या असून या फेरींतून 2 लाख 61 हजार 953 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. 1 लाख 28 हजार 615 विद्यार्थांनी सर्वाधिक वाणिज्य शाखेला पसंती दिली आहे. यामध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या सर्वधिक आहे.
यंदा अकरावीचे प्रवेश राज्यातील सर्वच ठिकाणी ऑनलाइन झाले आहेत. यामुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील जे प्रवेश ऑफलाईन होत होते ते यावर्षी ऑनलाईन झाले आहेत. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत आकडेवारीत वाढ झाली आहे. मुंबई विभागातील चारही जिल्ह्यांत वणिज्य शाखेत 1 लाख 28 हजार 615 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यानंतर विज्ञान शाखेत 1 लाख 1 हजार 33 तर कला शाखेतून 32 हजार 305 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
यामुळे मुंबई आणि उपनगरात सर्वाधिक म्हणजे 1 लाख 16 हजार 45 प्रवेश नोंदवले गेले आहेत. त्यापैकी वाणिज्य शाखेत तब्बल 65 हजार 609 विद्यार्थी असून, विज्ञान शाखेत 40 हजार 560 आणि कला शाखेत 9 हजार 876 विद्यार्थ्यांची पसंती दिली आहे.
ठाणे जिल्ह्यात 86 हजार 499 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. येथेही वाणिज्य शाखेत प्रवेश अधिक झाले आहेत. वाणिज्य शाखेत 39 हजार 505, विज्ञानमध्ये 36 हजार 491 आणि कला शाखामध्ये 10 हजार 503 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. पालघरमध्ये 31 हजार 918 प्रवेश झाले असून, त्यात वणिज्य शाखेत 13 हजार 876, विज्ञान शाखेत 10 हजार 983 आणि कला शाखेतून 7 हजार 59 विद्यार्थी आहेत.
रायगड जिल्ह्यात 27 हजार 491 प्रवेश झाले असून, कला शाखेत 9 हजार 625, विज्ञानमध्ये 12 हजार 999 आणि कला शाखेमध्ये 4 हजार 867 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. महामुंबईत प्रवेशाच्या आकडेवारीवरून वाणिज्य शाखेला सर्वाधिक दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांनी पसंती मिळत असल्याचे स्पष्ट झाले असून, विज्ञान शाखेला दुसर्या क्रमांकावर आणि कला तिसर्या क्रमांकावर पसंती दिली आहे. वाणिज्य क्षेत्रातील नोकरीच्या वाढत्या संधी, चार्टर्ड अकाउंटंसी, कंपनी सेक्रेटरी आणि मॅनेजमेंटसारख्या अभ्यासक्रमांबाबत वाढती जागरूकता यामुळे या शाखेकडे कल वाढत आहे.
दुसरीकडे, विज्ञान शाखेतून अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरकडे विद्यार्थ्यांचा कल ओढा आहे, तर कला शाखेतून समाजशास्त्र,राज्यशास्त्र आदी विषयांची आवड असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी झाल्याची महिती कनिष्ठ महाविद्यायातील प्राचार्यांनी दिली आहे.
अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या विशेष फेरीला 12 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. तसेच 15 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या अर्जात महाविद्यालयांच्या पसंतीक्रमात बदल करण्याची मुभा असणार आहे. यानंतर 19 ऑगस्ट रोजी प्रवेशाची यादी ऑनलाइन पोर्टलवर जाहीर होणार आहे.