नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-ऐरोलीदरम्यान एमआरव्हीसीच्या माध्यमातून दिघागाव रेल्वे स्थानक साकारण्यात आले आहे. हे रेल्वे स्थानक सुरु होऊन जवळपास दोन वर्ष होत आले. मात्र आजही दिघागाव रेल्वे स्थानकात जाणाऱ्या नागरिकांना ठाणे-बेलापूर मार्ग ओलांडून जावे लागत आहे. जीव मुठीत धरून पादचारी रस्ता ओलांडत आहेत. या पादचाऱ्यांमुळे सकाळ-संध्याकाळच्या वेळी या मर्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीत रुग्णवाहिकांची देखील घुसमट होत आहे.
कळवा येथील अद्ययावत छत्रपती शिवाजी रुग्णालयात नवी मुंबईतील ऐरोली, दिघा, घणसोली, कोपरखैरणे येथील रुग्णांना नेले जाते. त्याचप्रमाणे ऐरोलीतील बर्न हॉस्पिटलमध्ये ठाणे, मुंबईतील रुग्ण मोठया प्रमाणात येत असतात. शिवाजी रुग्णालयातील रुग्णांना देखील उपचारांसाठी सायन, जे.जे. रुग्णालय, वाडिया, केईएम येथील रुग्णालयांमध्ये पाठवण्यात येते. यावेळी ठाणे-बेलापूर मार्ग हा महत्वाचा मार्ग ठरत आहे. मात्र दिघा येथील ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका रुग्णांना बसत आहे.
उरण जेएपीटीकडून घोडंबदरमार्गे गुजरातकडे जाणारी अवजड वाहने देखील याच मार्गावरून जात असतात. या अवजड वाहनांमधून वाट काढताना रुग्णवाहिका चालकांना देखील तारेवरची कसरत करावी लागते. दररोज तीन ते चार रुग्णवाहिका सायरन वाजवत या वाहतूककोंडीतून मार्ग काढत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्याचप्रमाणे दिवागाव चौकीपासून रबाले टी जंक्शनपर्यंतच्या रस्त्यात देखील अवजड वाहनांमुळे रुग्णवाहिका अडकून पडत आहेत. अवजड वाहनांमुळे रुग्णवाहिका या कोंडीतच अडकून राहत असल्यामुळे रुग्णाला घेऊन जाणारे नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत.
अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पण ज्यावेळी वाहतूक कोंडी होते, त्या स्पॉटवर वाहतूक पोलीस तैनात केले जातात. त्यांच्याकडून रुग्णवाहिकांना प्रथम प्राधान्य देऊन रस्ता मोकळा करून दिला जातो, असे येथील वाहतूक पोलिसांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.