

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा करण्यात येत आहेत. यात चैत्यभूमी परिसरात आरओ प्लांट बसवण्यात येणार आहेत.
चैत्यभूमी परिसरासह छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथे पुरेशा सेवा सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी स्वतंत्र असे पिंक टॉयलेट्स, हिरकणी कक्ष, अतिरिक्त प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच संपूर्ण परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेेसाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. पायवाटांवर धूळ प्रतिबंधात्मक आच्छादनाचीदेखील व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
रांगेतील अनुयायांसाठी, मुख्य रस्त्यांवर, इंदू मिल परिसर, शिवाजी पार्क याठिकाणी अतिरिक्त शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिलांसाठी पिंक टॉयलेटची व्यवस्था 5 ते 6 ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच माता आणि बालकांच्या सुविधेसाठी हिरकणी कक्षांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
सोशल मीडियाचा वापर
फेसबुक, एक्स, यूट्यूब आधी सोशल मीडियावर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटद्वारे 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी व आजूबाजूच्या परिसराचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अनुयायांना मार्गदर्शनाकरीता 100 फूट उंचीवर स्थळ निदर्शक फुगे सोडले जाणार आहेत.
सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे
चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे सीसीसीटीव्ही कॅमेरा, फिरते कॅमेरा आणि मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर आदी सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याशिवाय नियंत्रण कक्ष, माहिती कक्ष आणि निरीक्षण मनोऱ्यांची उभारणी, अग्निशमन वाहने, अतिदक्षता रुग्णवाहिका, बोटी आदींची व्यवस्थादेखील केली जाणार आहे.