Patit Pavan Mandir Ratnagiri History Pudhari
मुंबई

Patit Pavan Mandir Ratnagiri History: पतित पावन मंदिर : सामाजिक समतेचा रत्नागिरीतील क्रांतिकारी दीपस्तंभ

स्वा. विनायक दामोदर सावरकरांच्या पुढाकारातून 1931 मध्ये उभारलेले भारतातील पहिले सर्वजातीय मंदिर; इतिहास, संघर्ष आणि प्रेरणादायी वारसा

पुढारी वृत्तसेवा

साहित्य-संस्कृती डॉ. महेश केळुसकर

पतित पावन मंदिर हे रत्नागिरी इथं उभारलेलं असून ते दलितांना प्रवेश देणारं भारतातलं पहिलं मंदिर आहे. दरवर्षी सर्वजातीय हजारो पर्यटक या मंदिराला भेट देतात. पतित पावन या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे तथाकथित उच्च समाजाकडून अव्हेरल्या गेलेल्या समाजाला स्वीकारून शुद्ध करून घेणे होय. हे मंदिर 1931 मध्ये भागोजी शेठ कीर यांनी स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या सांगण्यावरून बांधलं. या देवळामध्ये मुख्य देवता म्हणून लक्ष्मी नारायणाची मूर्ती आहे.

जाती व्यवस्था ही भारतीय समाजामध्ये खोलवर रुजलेली व्यवस्था आहे आणि त्यामुळे भारतीय समाजाचं खूप नुकसान झालेलं आहे.

हे स्वा. सावरकरांनी ओळखलं व त्यामुळे जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेमध्ये असताना वेगवेगळ्या प्रकारची कामं केली. त्यापैकी एक म्हणजे पतितपावन मंदिराची स्थापना हे होय.

रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर पुरातन आहे. राजस्थानातून आलेल्या गुजर कुटुंबीयांनी हे मंदिर बांधलं. स्वा. सावरकरांनी पतितपावन मंदिर उभारण्यापूर्वी जनसामान्यांना या मंदिरात प्रवेश मिळावा, म्हणून लढा दिला होता. या संघर्षामुळे बहुजन समाजाच्या नागरिकांना सभामंडपापर्यंत प्रवेश देण्यात आला होता. विठ्ठल मंदिरातील सत्याग्रहाचा अनुभव लक्षात घेऊन सामाजिक समतेच्या उद्घेोषासाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याचा निश्चय सावरकरांनी केला.

श्री. भागोजी शेठ कीर हे शिवभक्त होते आणि त्यांना सामान्य मंदिरात प्रवेश नसल्यानं त्यांनी भागेश्वर मंदिर नावाचं खासगी शिवमंदिर स्वतःसाठी बांधून घेतलं होतं, हे त्यांनी सावरकरांना सांगितलं. सावरकरांनी कीरांना उपदेश केला की, आपण धनवान, स्वतंत्र देऊळ बांधले, हे दलित निर्धन, त्यांना देव नाही, देवालय नाही, देवदर्शन नाही. त्यांच्यावरचा अन्याय दूर व्हावा म्हणून सर्व हिंदू लोकांकरिता एक स्वतंत्र मंदिर आपण बांधावे. कीरांनी ही सूचना मान्य केली. त्यानुसार तीन लाख रुपये खर्च करून श्री पतित पावन मंदिराची उभारणी केली. 22 फेब्रुवारी 1931 या दिवशी पतित पावन मंदिराचं उद्घाटन करायचं असं ठरलं. या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भागोजी शेठ कीरांच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने करायची असं ठरलं आणि त्यासाठी काशीहून पंडितांना बोलवण्यात आलं. आयत्या वेळेला भागोजीशेठना वेदोक्ताचा अधिकार नाही, त्यामुळे विधी पुराणोक्त पद्धतीने करू असं सांगून काशीच्या ब्राह्मणांनी अडचणीचा प्रसंग उभा केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे मान्य नव्हतं. मुहूर्त टळेल त्यामुळे पुराणोक्त पद्धतीनं विधी करू असा प्रस्ताव कीर व शंकराचार्य कुर्तकोटी यांनी मांडला. तो अमान्य करत स्वातंत्र्यवीर म्हणाले, “शेटजी, देऊळ आपले, धनी आपण, त्यामुळे समारंभ आपण करालच. पण प्रत्येक हिंदूस वेदोक्ताचा अधिकार आहे. जुनी देवळे थोडी नाहीत. नवीन तत्त्वाचे अधिष्ठान म्हणून हे नवीन देऊळ हवे होते. ते साधत नसेल तर आपण मलाही सोडावे. पण, आपण जर तत्त्वास सोडणार नसाल तर याही परिस्थितीत समारंभ मी पार पाडीन. पण आमच्या नव्या अखिल हिंदू स्मृतीच्या आधारे. काशीच्या ब्राह्मणांना उद्देशून सावरकर म्हणाले,

“तुम्ही मंडळींनी वेदोक्त विधी करू म्हणून मान्य केल्याचे पत्री आम्हाला कळविले. मी माझ्या पत्रात वेदोक्ताचा अर्थ स्पष्ट कळवला होता. त्यावर आक्षेप न घेता आपण काशी- सारख्या अंतरावरून इथं आलात. मला जन्माने ब्राह्मण तो पुरोहित हे तत्त्वही मान्य नाही. पण कीर शेठजींची इच्छा ब्राह्मण हवेत म्हणून अडलो. पण, आपण जर आता नाकाराल तर आजचा मुहूर्त टळून कार्य रद्द होईल, असे जर कोणी अडवू म्हणत असेल तर ते कदापि घडणार नाही. हा जो इथे अखिल हिंदू समाज दाटलेला आहे, त्या शतावधी धर्मबांधवांसह आम्ही ही देवमूर्ती अनंत हस्ती उचलून जय देवा असे गर्जून स्थापणार. हाच आमचा विधी! हिंदू धर्म की जय असे हजारो कंठांतून निघणारे जयघोष हाच आमचा वेदघोष आणि ‌‘भावो ही विद्यते देव: हाच आमचा शास्त्राधार.‌’ पण, तरी काशीच्या पंडितांनी हे कार्य पार पाडलं नाही. मसूरकर महाराजांच्या आश्रमातील वेदशास्त्र संपन्न गणेश शास्त्री मोडक यांनी वेदोक्त विधीने यथाशास्त्र पूजा सांगून कीरांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

पतित पावन मंदिर उभारणीनंतर अनेक लोकांकडून सावरकरांना विरोध सहन करावा लागला पण अनेक पुरोगामी नेत्यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सावरकरांना कळवले की, “सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात तुम्ही काम करीत आहात त्याविषयी अनुकूल अभिप्राय देण्याची संधी घेत आहात. जर अस्पृश्य वर्ग हिंदू समाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल तर नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही,

तर चातुर्वर्ण्याचे उच्चाटन झाले पाहिजे. ज्या थोड्या लोकांना याची आवश्यकता पटली आहे त्यापैकी एक आपण आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो.

याच मंदिर परिसरात सावरकरांचं प्रेरणादायी स्मारक उभारलं आहे. स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर गाथा बलिदानाची हे प्रदर्शन असून 1857 च्या स्वातंत्र्यसमरापासून ते स्वातंत्र्य काळापर्यंतचे देशभक्त, क्रांतिकारक, हुतात्मे यांचा तेजस्वी इतिहास इथे मांडण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या ज्या वस्तूंनी इतिहास घडवला ती सावरकरांनी लंडनहून पाठवलेली दोन पिस्तुलं, त्यांची काठी, जंबिया, त्यांचा चष्मा, अशा अनेक गोष्टी तेथे जपून ठेवल्या आहेत. मार्सेलिस बंदरावर ज्या बोटीतून सावरकरांनी समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली, त्या मोरिया बोटीची प्रतिकृती तेथे ठेवली आहे. तळमजल्यावरील सभागृहात माहितीपटांद्वारे सर्वांना थोर नररत्ने व इतरही अनेक गोष्टींची माहिती देण्यात येते. तुमच्यापैकी जेव्हा कधी कोणी रत्नागिरीला जाल तेव्हा थिबा पॅलेस, पांढरा समुद्र, भाट्याची खाडी, लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान या ठिकाणांना भेट द्यालच. पण पतितपावन मंदिरालाही भेट द्यायला आणि त्याचा इतिहास जाणून घ्यायला विसरू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT