Party spokespersons should make statements carefully: MP Sunil Tatkare
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसमध्ये संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चाना अलीकडेच प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या 'पांडुरंगाच्या इच्छेने एकत्र येऊ' या विधानामुळे गती मिळाली होती. मात्र, हे विधान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फारसे पचनी पडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी थेट इशारा देत मिटकरींना बोलताना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे.
सुनील तटकरे यांनी सांगितले, अमोल मिटकरींना सल्ला आहे की त्यांनी वक्तव्य जपून करावे. ते पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे पक्षाची भूमिका एकदा मांडल्यानंतर पुन्हा त्यावर बोलण्याची गरज नाही, असे तटकरे यांनी ठणकावून सांगितले. आम्ही राज्यात महायुतीत आहोत. देशात एनडीएत आहोत. हा आमचा ठाम निर्णय आहे आणि त्यात जराही बदल होणार नाही.
एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय कुणा एकट्याने घेतलेला नसल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले. अजितदादा, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि मी, आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने हा निर्णय घेतला. राज्यातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, असे तटकरे म्हणाले.