

Chief Minister Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
जनतेने नाकारल्यानेच राहुल गांधी हे जनादेश नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारून कुठे चुकतो आहोत, जन-तेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा त्यांना एकदा विचार करायला हवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारले आहे. राहुल गांधी यांच्या लेखाला आकडेवारीसह उत्तर दिल्याने आतातरी ते निवडणुकांबाबत अशी विधाने करणे थांबवतील, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
राहुल गांधी यांनी शनिवारी काही वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेल्या लेखातून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या लेखाला लेखातूनच उत्तर दिले जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, रविवारी फडणवीस यांचा लेख प्रसिद्ध झाला.
यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, लेखाला लेखानेच तथ्य आणि आकड्यांसह उत्तर दिले आहे. त्यामुळे यापुढे राहुल गांधी अशा प्रकारचे बोलणे टाळतील. ज्या तीन वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच तीन वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख आले. लेखाच्या सुरुवातीलाच 'भारत जोडो' च्या नावाखाली चालविलेल्या 'भारत तोडो' अभियानात डॉ. मनमोहन सिंग यांनी ठपका ठेवलेल्या किती नक्षली संघटना होत्या, असा सवाल फडणवीस यांनी केला.
२००४ मध्ये लोकसभेपेक्षा विधानसभेत ५ टक्के अधिक होते, २००९ मध्ये चार, २०१४ मध्ये तीन, २०१९ मध्ये १ टक्का तर २०२४ मध्ये चार टक्के अधिक आहे. त्यामुळे २०२४ मध्ये काहीही नवीन घडले असे नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले. तसेच, दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रतितास सरासरी ५.८३ टक्के इतके मतदान झाले. त्यामुळे शेवटच्या एक तासात ७.८३ टक्के इतकी वाढ झाली आहे, असे सांगून आपण काय नवीन सांगता आहात ? सायंकाळी ५ ते ६ हीसुद्धा मतदानाची वेळ आहे. तसेच, ६ पर्यंत बुथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो, ही बाब राहुल गांधी माहिती नाही का, असा प्रश्नही फडणवीसांनी केला.
१९५० पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारनेच थेट नियुक्त केले होते, आतापर्यंतच्या २६ पैकी २५ आयुक्तांची केंद्र सरकारकडून थेट नेमणुका करण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेत प्रथमच नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेता किंवा सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली. पण, लोकशाहीला भक्कम करणारे आणि तुमच्या काळात कधीही पाळले न गेलेले पाऊल तुम्हाला आवडलेले दिसत नाही, असा टोलाहा फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला.
ज्या १२ हजार मतदान केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती, त्यापैकी बहुतेक जागा एनडीएच्या पारड्यात गेल्याचा राहुल गांधींचा आरोप अर्धवटपणाचा आहे. ज्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी मतदार टक्केवारीत वाढ झाली तेथे एनडीएच जिंकली, हे तर आणखी हास्यास्पद दावा आहे. त्यासाठी त्यांनी कामठीचे उदाहरण दिले. पण, जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देतो आहे. माढ्यात १८ टक्के वाढ होती तिथे शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला, वणीत १३ टक्के वाढ होती तिथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला, तर श्रीरामपूर येथे १२ टक्के वाढ नोंदविली तिथे काँग्रेस जिंकली, याची आठवण फडणवीस यांनी करून दिली.