Panvel Mayor Election Pudhari
मुंबई

Panvel Mayor Election: पनवेल पालिकेवर भाजपची पाटीलकी; आगरी समाजाला संधी, महापौरपदी नितीन पाटील, तर उपमहापौरसाठी प्रमिला पाटील यांना उमेदवारी

नितीन पाटील महापौर, प्रमिला पाटील उपमहापौर उमेदवार; पनवेल महापालिकेत भाजपची भक्कम सत्ता

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : विक्रम बाबर

पनवेलच्या महापौर व उपमहापौर पदाकरिता भाजप महायुतीने शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. महापौर पदासाठी नितीन जयराम पाटील, तर उपमहापौर पदासाठी प्रमिला रविनाथ पाटील यांनी अर्ज भरले. या दोन्ही पदासाठी भाजपने पहिली सव्वा वर्षे आगरी समजाला संधी दिली असून आगरी समाजाचा पहिला महापौर पनवेल महापालिकेत बसणार आहे.

पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 55, शिवसेनेने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवत एकूण 59 जागांसह पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजप महायुतीची भक्कम सत्ता प्रस्थापित केली आहे. 10 फेब्रुवारीला महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी भाजप महायुतीकडून अर्ज दाखल करण्यात आले.

या दोन्ही पदासाठी पनवेल भाजपकडून प्रदेश भाजपकडे नावे सुचवण्यात आली होती. त्यांच्या मान्यतेने या नावांची निवड झाली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.

अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, यांच्यासह नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते. अर्ज भरण्यापूर्वी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्यासह महायुतीमधील नेत्यांनी नितीन पाटील व प्रमिला पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालकरीता शुभेच्छा दिल्या.

औपचारिक लढत

दरम्यान, महापौर निवडीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीनेही आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. शेतकरी कामगार पक्षाकडून अर्चना भाईर यांनी महापौरपदासाठी तर काँग्रेसकडून लीला कातकरी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारी रोजी महापौर निवडणुकीत औपचारिक लढत होणार असली तरी पक्षीय बलाबल पाहता भाजप महायुतीचे पारडे जड मानले जात आहे. सध्या महायुतीकडे 59 नगरसेवकांचा पाठिंबा असून एक अपक्ष सदस्यही त्यांच्या बाजूला असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे 18 नगरसेवक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT