ऑरेंज गेट बोगद्याचे 250 मीटर भुयारीकरण पूर्ण  pudhari photo
मुंबई

Orange Gate tunnel project : ऑरेंज गेट बोगद्याचे 250 मीटर भुयारीकरण पूर्ण

प्रकल्पामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम दळणवळण सुलभ होईल.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ऑरेंज गेट भूमिगत रस्ता बोगदा प्रकल्पात एक मोठा अभियांत्रिकी टप्पा पूर्ण झाला आहे. अत्याधुनिक स्लरी शिल्ड टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) तंत्रज्ञानाचा वापर करून अंदाजे 250 मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम दळणवळण सुलभ होईल.

ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगदा रस्ता प्रकल्पाच्या मुख्य भुयारीकरणाला 27 मार्चला सुरुवात करण्यात आली होती. 3 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टीबीएम जमिनीखाली उतरवण्यात आले होते. मुंबईच्या किनारी भूभागातील मिश्र व खडतर भूस्तरासाठी अचूक व सुरक्षित खोदकाम करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या स्लरी-शिल्ड टनल बोरिंग मशीनने (टीबीएम) भुयारीकरण करण्यात आले आहे.

ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पामुळे प्रवासाचा कालावधी गर्दीच्या वेळेत 40 मिनिटांवरून अंदाजे 5 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल व इंधन बचत होईल. अंदाजे 4.8 किमी लांबीच्या दुहेरी बोगद्यांसह प्रत्येक बोगद्यात दोन वाहतूक मार्गिका आणि एक आपत्कालीन मार्गिका असेल. आपत्कालीन प्रवेशासाठी प्रत्येकी 300 मीटरवर क्रॉस-पॅसेज देण्यात येणार आहेत. जमिनीखालून जवळपास 50 मीटर खोलीपर्यंत बोगद्यांची रचना करण्यात आली आहे.

या प्रकल्पात मुंबईच्या किनारी भूभागात सामान्यतः आढळणाऱ्या किनारी आणि मिश्र भौगोलिक परिस्थितींमध्ये खोल नागरी बोगदा खोदकामासाठी विशेषतः विकसित उच्च-क्षमता स्लरी शिल्ड टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात येत आहे. सध्या 250 मीटरपेक्षा अधिक बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. पूर्ण झालेल्या बोगद्यांमध्ये कायमस्वरूपी सेगमेंटल लाइनिंग रिंग्सची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी कमी होणार

हा बोगदा पश्चिम व मध्य रेल्वे मार्गिका तसेच त्यांच्याही खाली असलेल्या मेट्रो 3 मार्गिकेच्या खालून जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हदरम्यानचा प्रवास केवळ 5 मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे पूर्व-पश्चिम दळणवळण सुलभ होईल, तसेच किनारी मार्ग आणि अटल सेतू यांच्याशी थेट जोडणी निर्माण होईल. परिणामी वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि प्रदूषण यामध्ये लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार हा बोगदा वानखेडे स्टेडियम येथे न संपता गिरगाव चौपाटीजवळ मफतलाल जलतरण तलाव येथे संपेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT