Maharashtra politics Pudhari
मुंबई

Maharashtra politics : भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी

शक्य तेथे एकत्र येणे, अन्यथा बंडखोरांना संधी देण्याबरोबरच अजित पवारांना सोबत घेण्याचे प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई ः महानगरपालिका निवडणुकीत गेल्यावेळी प्रचंड यश मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाची घोडदौड थांबवण्यासाठी मुंबई, ठाणे नागपूर या मोठ्या महापालिकांत एकत्र आघाडी उभी करण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

मुंबईत काँग्रेसने निर्णयचा फेरविचार करावा याबरोबरच पुणे, पिंपरी-चिंचवड येथे बलढ्या असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्यासोबत यावे, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. सहकारी पक्षांना सामावून घेण्याचे आव्हान मोठे नसून, भाजपला रोखणे महत्त्वाचे असल्याचे दिल्लीस्तरावरून कळवले गेले आहे. भाजप कार्यकर्त्यांना शिवसेना शिंदेगटाशी युती करण्याचा निर्णय आवडलेला नाही, तेथे नाराज झालेल्यांना संधी देणे विजयाचा फॉर्म्युला असू शकेल, असे सांगत उमेदवारांची घोषणा शेवटच्या क्षणी करण्याचा निर्णय काँग्रेसने जवळपास अंतिम केला आहे.

भाजपने उमेदवारी दिली नाही त्या ठिकाणच्या बंडखोरांची प्रतीक्षा करण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाण्याच्या तयारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना एकनाथ शिंदे यांना समवेत घेण्याचा निर्णय झाला असल्यामुळे भाजपातील नाराज मंडळी बाहेर पडतील, ती शक्तिशाली असतील तर त्यांनाच उमेदवारी देणे हे विजयासाठी उपयुक्त ठरेल, असे काँग्रेस वर्तुळात बोलले जात होते. मुंबईमध्ये महायुतीत स्थान नसलेल्या अजित पवारांना जवळ करावे हा विचार आता समोर आला आहे. काँग्रेसने उमेदवारी घोषित करण्यासाठी कोणतीही घाई करायची नाही असा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनीही या धोरणाला मान्यता दिली असल्याचे कळते.

बंडखोरांना संधीची व्यूहरचना

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कडव्या सैनिकांना संधी द्यायची असल्याने भाजपच्या बंडखोरांशी आपले देणे-घेणे नसल्याची त्या पक्षाची भूमिका आहे. राज्याच्या राजकारणात पक्षनिष्ठा किंवा वैचारिक भूमिकांना कोणतेही महत्त्व राहिलेले नाही. 2019 नंतर काहीही होऊ शकते हे लक्षात घेत आता बंडखोरांना संधी देऊन निवडून आणणे हे विरोधकांनी सूत्र ठरवले असल्याचे समजते. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत 2736 जगापैकी भाजपने 1099 ठिकाणी विजय मिळवला होता. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. भारतीय जनता पक्षापासून दलित, मुस्लिम मतदार बाजूला ठेवायचा विचारही या निवडणुकीचा मुख्य मुद्दा असावा, अशी चर्चा आहे. या निवडणुकीत आपला मतदार आपल्याकडेच राहावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातील.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याची इच्छा असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणातमध्ये प्रतिष्ठा राखून असलेले नेते बंडखोरांना उमेदवारी देऊन त्या मार्गाने जिंकू अशा भूमिकेला पोहोचले आहेत. अजित पवार त्यांना यासाठी साथ देतील काय, याची चाचपणी सध्या सुरू आहे.

...तर भाजप ठरणार राज्यात अव्वल

दुसरीकडे, पक्षातील मंडळी नाराज होऊन कुठेही जाऊ नयेत यावर सध्या भर देणे आवश्यक असल्याचे मत भारतीय जनता पक्षाने व्यक्त केले. भाजपने केलेल्या पाहणीत पक्षासाठी अतिशय चांगले वातावरण आहे. मात्र, गेली काही वर्षे अपेक्षेचे काम केलेल्या कार्यकर्त्यांना संधी नाकारली गेली तर त्याचा परिणाम काय होईल, यावर सध्या मंथन सुरू आहे. हे आव्हान यशस्वीपणे पेलले तर भाजप राज्यात क्रमांक एकचा पक्ष असेल, असे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT