NSE IPO Valuation Pudhari
मुंबई

NSE IPO Valuation: एनएसईचे मूल्यांकन ५५ अब्ज डॉलर!आयपीओनंतर होणार जगातील सहावा मोठा शेअर बाजार

संभाव्य गुंतवणूकदारांसोबतच्या बैठकांमध्ये एक्स्चेंजने आपल्या शेअर्सची किंमत प्रतिशेअर २ हजार ते २,१०० रुपये या श्रेणीत असल्याचे सांगितले आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: व्यवहारांच्या संख्येनुसार (ट्रेडिंग व्हॉल्यूम) जगातील सर्वांत मोठ्या डेरिव्हेटिव्हज् एक्स्चेंजचे संचालन करणाऱ्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडने (एनएसई) आपल्या नियोजित इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) साठी ५.२६ लाख कोटी रुपये (५५ अब्ज डॉलर्स) मूल्यांकन होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

संभाव्य गुंतवणूकदारांसोबतच्या बैठकांमध्ये एक्स्चेंजने आपल्या शेअर्सची किंमत प्रतिशेअर २ हजार ते २,१०० रुपये या श्रेणीत असल्याचे सांगितले आहे. एनएसईने आयापीओ दाखल करण्यापूर्वी जगभरातील बड्या गुंतवणूकदारांशी आपल्या बैठका पूर्ण केल्या आहेत. तसेच पश्चिम आशियातील गुंतवणूकदारांशीही चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती या विषयाशी संबंधिक अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.

कंपनीने भारताची बाजार नियामक संस्था असलेल्या सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस (प्रारंभिक माहितीपत्रक) दाखल केले आहे. भारतातील सर्वांत मोठा शेअर बाजार असलेल्या एनएसईने बॉस्टन, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, लंडन, सिंगापूर आणि हाँगकाँग अशा विविध ठिकाणी गुंतवणूकदारांच्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये ब्लॅकरॉक इंक, कॅपिटल ग्रुप, जीक्यूजी पार्टनर्स, जानस हेंडरसन ग्रुप पीएलसी आणि ऑलस्प्रिंग ग्लोबल इन्व्हेस्टमेंटस्‌ यांसारख्या सुमारे १२० मोठ्या जागतिक गुंतवणूकदार कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

आयपीओ सप्टेंबरमध्ये?

एनएसईला ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत 'ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस्‌'साठी सेबीकडून मंजुरी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु ‘एसबीआय कॅपिटल मार्केटस्‌ लिमिटेड'चा आयपीओ प्रक्रियेत समावेश झाल्याने समभाग विकणाऱ्यांच्या यादीत बदल झाले आहेत.

त्यामुळे ही प्रक्रिया सुमारे तीन आठवडे लांबणीवर पडली, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. कारण आयपीओच्या कागदपत्रांमधील बदलांसाठी २१ दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. परिणामी हा आयपीओ येत्या सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात येण्याची शक्यता आहे.

एनएसईचे मूल्यांकन नॅसडॅकहून अधिक...

प्रस्तावित किंमत श्रेणीच्या उच्च मर्यादेचा विचार करता, बाजारमूल्यानुसार एनएसई (५४.९ अब्ज डॉलर मूल्यांकन) जगातील बड्या शेअर बाजारांच्या यादीत सहाव्या स्थानावर असेल. ‘लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप पीएलसीच्या (५५.८ अब्ज डॉलर) किंचित मागे आणि नॅस्डॅक इंकच्या (५४ अब्ज डॉलर) किंचित पुढे असेल.

सध्या सीएमई ग्रुप इंक (९६.३ अब्ज डॉलर) आणि इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज इंक (८६.६ अब्ज डॉलर) आणि हाँग काँग एक्सचेंज (६५ अब्ज डॉलर) हे पहिल्या तीन स्थानावर आहेत. एनएसई सहा टक्के बाजार हिस्सा विकून ३१५ अब्ज रुपये उभारू शकते. ही रक्कम २०२४ मध्ये ह्युंदाई मोटर कंपनीच्या भारतीय युनिटने उभारलेल्या २७८.७ अब्ज रुपयांपेक्षाअधिक असेल. त्यासाठी एनएसई १४.८९ कोटी शेअर्स विकण्याच्या तयारीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT