Pratap Sarnaik Pudhari
मुंबई

Marathi language training |'अमराठी रिक्षा-टॅक्सी चालक ४८ तासांमध्ये 'जुजबी मराठी' शिकू शकतील : मंत्री प्रताप सरनाईक'

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी 'प्राथमिक मराठी' ज्ञान देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन

पुढारी वृत्तसेवा

Marathi language training

मुंबई: राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान व्हावे, यासाठी राज्य सरकारने नवा उपक्रम सुरु केला आहे. आज (दि. २९) मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी 'प्राथमिक मराठी' ज्ञान देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्‍तिकेच्‍या मदतीने 'अ'मराठी रिक्षा-टॅक्सी चालक ४८ तासांमध्‍ये 'जुजबी मराठी' शिकू शकतील. 15 ऑगपर्यंत जुजबी मराठी चालक शिकले तर त्यांना पुढचं मोठं पुस्तक देखील आम्ही देऊ, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (दि. २९) माध्‍यमांशी बोलताना व्‍यक्‍त केला.

मोबाईलवर ऑडिओ स्वरूपातही मराठी शिकता येईल

या उपक्रमाबाबत माहिती देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, कोकण साहित्य परिषद आणि मुंबई साहित्य संघाच्या सहकार्याने ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेच्या मदतीने अवघ्या ४८ तासांत मराठीचे प्राथमिक ज्ञान मिळवणे शक्य आहे. पुस्तिकेवर बारकोड देण्यात आला असून, तो स्कॅन केल्यास चालकांना मोबाईलवर ऑडिओ स्वरूपातही मराठी शिकता येईल.

१५ ऑगस्‍टपर्यंत दंड आकारला जाणार नाही

चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंतची मूदत देण्यात आली आहे. तोपर्यंत भाषेवरून कोणताही दंड आकारला जाणार नाही. १५ ऑगस्टपर्यंत ज्यांनी प्राथमिक मराठी आत्मसात केली आहे, त्यांना प्रगत मराठी शिकण्यासाठी पुढील मोठे पुस्तक दिले जाईल.

मराठी माणसांनीही आपली जबाबदारी ओळखावी

"रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये बसल्यानंतर समोरचा चालक कोणीही असो, त्याच्याशी मराठीतच बोलावे ही भूमिका मराठी माणसाने घेतली पाहिजे. केवळ चालकच नाही, तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी माणसानेही आपली जबाबदारी ओळखावी, असे आवाहन सरनाईक यांनी केले.

ओला आणि उबेर चालकांसाठीही नियम लागू

या मोहिमेची अंमलबजावणी तपासण्यासाठी प्रत्येक आरटीओ (RTO) क्षेत्रात चालकाची मराठी भाषेची चाचणी घेतली जाईल. तसेच, रिक्षा-टॅक्सी सोबतच आता ओला आणि उबेर (Ola-Uber) चालकांसाठीही हा नियम लागू असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरेंच्‍या विचारांचा वारसा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, "महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलता आलेच पाहिजे आणि चालकांची मुजोरी सहन केली जाणार नाही," असा इशारा दिला आहे. हीच भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि तोच वारसा मुख्यमंत्री पुढे नेत असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले.

... तर 'त्‍यांना' कायदेशीर नोटिशीद्वारे चोख उत्तर दिले जाईल

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक आणि त्यांच्या समर्थकांवर जागा हडपल्याचे गंभीर आरोप केले होते. यावर बोलताना सरनाईक म्हणाले, "जर काही बेकायदेशीर कृत्य झाले असेल, तर त्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. जो कायदा सर्वसामान्यांना लागू आहे, तोच मलाही लागू आहे. मात्र, जर कोणी जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना कायदेशीर नोटिशीद्वारे चोख उत्तर दिले जाईल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT