

Utkarsh Shinde Marathi post: महाराष्ट्रात सध्या रिक्षा चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे, या मुद्द्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. ४ मे पासून काही रिक्षा चालक संघटनांनी या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला असून, आता या वादात मराठी कलाकारांनीही उडी घेतली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यानंतर आता प्रसिद्ध गायक आणि संगीतकार उत्कर्ष शिंदे यांनी सोशल मीडियावर अत्यंत आक्रमक पोस्ट शेअर करत परप्रांतीय रिक्षाचालकांना खडेबोल सुनावले आहेत.
उत्कर्ष शिंदे यांनी दादर येथील शिवसेना भवन समोरचा आपला एक फोटो शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, "मराठी येत नसेल तर शिका आणि शिकायची नसेल तर इथून निघून जा! परप्रांतीय मित्रांनो, आम्हाला तुमचा द्वेष नाही, तर आमच्या मराठी भाषेचा मान, सन्मान आणि अभिमान आहे." उत्कर्षची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर त्याने घेतलेल्या या भूमिकेचे नेटकऱ्यांकडून समर्थन केले जात आहे.
केवळ उत्कर्षच नाही, तर अभिनेता रितेश देशमुख यानेही मराठी भाषेच्या सक्तीबाबत आपले मत मांडले आहे. रितेशने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, जर तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करत असाल, तर इथल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला इथली भाषा येणे ही प्राथमिक गरज आणि कर्तव्य आहे. रितेशच्या या भूमिकेचा संदर्भ देत आता अनेक कलाकार या मोहिमेत सहभागी होत आहेत.
काही रिक्षा चालक संघटनांनी मागणी केली आहे की, ज्या चालकांना मराठी येत नाही, त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. या मागणीसाठी ४ मे पासून संपाची तयारी सुरू आहे. परप्रांतीय चालकांमुळे स्थानिक मराठी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आणि भाषेच्या अभावामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.