मुंबई: वैद्यकीय शिक्षणाच्या प्रथम वर्षातील परीक्षा निर्धारित चार प्रयत्नांत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता आणखी एक संधी मिळणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) विशेष बाब म्हणून एमबीबीएस प्रथम वर्ष उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम वर्षाच्या चार नियमित प्रयत्नांनंतरही अनुत्तीर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना पाचव्या प्रयत्नाद्वारे वैद्यकीय शिक्षण सुरू ठेवता येणार आहे.
एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशापासून चार वर्षांचा कालावधी किंवा चार प्रयत्नांची मर्यादा लागू आहे. मात्र, या कालावधीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षण अडचणीत आले होते.
विशेषतः करोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडथळे आले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासह देशातील अन्य विद्यापीठांनी संबंधित विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची मागणी एनएमसीकडे केली होती. या मागणीची दखल घेत आयोगाने एकवेळची विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
एनएमसीच्या निर्णयानुसार, शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून पुढील सर्व तुकड्यांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या विशेष संधीचा लाभ घेता येणार आहे. प्रथम वर्ष उत्तीर्ण होण्यासाठी निर्धारित चार प्रयत्न पूर्ण झाले असले, तरी पात्र विद्यार्थ्यांना अतिरिक्त प्रयत्न करता येईल. मात्र, संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश वैध असणे आवश्यक आहे. महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार नाही.
दहा वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट कायम
एमबीबीएसचा संपूर्ण अभ्यासक्रम आंतरवासितेसह दहा वर्षांच्या आत पूर्ण करण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त संधी मिळाली असली, तरी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीच्या एकूण कालमर्यादेचे पालन करावे लागणार आहे.
या निर्णयासंदर्भातील परिपत्रक एनएमसीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून, संबंधित विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांना त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत