

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात नवी माहिती समोर आली आहे. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी मुंबईजवळ एका ठिकाणी बंदुकीतून गोळ्या झाडण्याचा सराव केल्याचा संशय आहे. तसेच अंधेरीतील एका हॉटेलच्या खोलीत बंदुकीची चाचणी घेताना गोळी सुटून बेडवर आदळल्याचे सांगण्यात येते. या घटनांबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
आरोपींच्या चौकशीतून बंदुकीची चाचणी घेतलेल्या अंधेरीतील हॉटेलच्या ठिकाणाबाबतची माहिती मिळाली असून या ठिकाणी एका आरोपीने दोन, तर दुसऱ्याने एक गोळी झाडल्याचे सांगितले जाते. टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यापूर्वी शस्त्र व्यवस्थित चालते की नाही, हे तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती का, याचा पोलिस तपास करत आहेत.
टायगरच्या गाडीवर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी मुंबईबाहेर पळ काढल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात शस्त्रे पुरविणारे आणि आरोपींना मदत करणारे इतर कोणी सहभागी आहेत का, याचाही तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींच्या भूमिकेची पडताळणी सुरू असून, गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र हस्तगत करणे आणि हल्ल्यापूर्वीच्या हालचालींची माहिती मिळविण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
अंधेरीतील हॉटेलमध्ये मुक्कामादरम्यान आरोपींनी बंदुकीची चाचणी घेतली. यावेळी गोळ्या बेडवर आदळल्याचे सांगितले जाते. या घटनेची हॉटेलमधील कर्मचारी किंवा अन्य कोणाला माहिती मिळाली होती का, तसेच खोलीतून किंवा संबंधित ठिकाणाहून काही पुरावे मिळू शकतात का, याची तपासणी केली जात आहे.
दोन महिलांसह चौघांना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणात शस्त्रे आणि दारूगोळा पुरवल्याचा आरोप असलेल्या दोन महिलांसह चार आरोपींना एस्प्लनेड येथील दंडाधिकारी न्यायालयाने २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गोळीबारासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल अद्याप हस्तगत झाले नसल्याने शस्त्रांचा स्रोत, त्यांची वाहतूक आणि आरोपींमधील संपर्कांची साखळी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
कुणाल सिंह (२१), सुमित सोरोलिया (१९), राधा वर्मा (२३) आणि बबिता राव (२३) अशी आरोपींची नावे आहेत. या चौघांना २० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
महिला आरोपींच्या सहभागावर प्रश्न
राधा वर्मा आणि बबिता राव यांच्या वतीने ॲड. अजिंक्य मिरगल यांनी बाजू मांडली. दोन्ही महिला गोळीबाराच्या वेळी घटनास्थळी उपस्थित नव्हत्या. त्यांच्याकडून आणखी काही हस्तगत करायचे शिल्लक नसल्याने त्यांना थेट न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, पोलिसांनी शस्त्रांच्या कथित पुरवठ्यातील त्यांची भूमिका तपासायची असल्याचे सांगत पोलीस कोठडीची मागणी केली.