मुंबई: राष्ट्रीय महामार्गांवरील पथकर नाक्यांजवळ राहणाऱ्या वाहनचालकांना दिलासा देणारा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घेतला आहे. पथकर नाक्यापासून २० किमीच्या परीघात राहणाऱ्या वाहनचालकांना १ नोव्हेंबरपासून १५०० ते ३००० रुपयांत वार्षिक पास उपलब्ध होणार आहे.
पथकर नाक्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी फास्टॅगद्वारे संगणकीय पद्धतीने पथकर आकारला जातो. राष्ट्रीय महामार्गांवरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी वार्षिक फास्टॅग पास सुविधा चालवली जाते.
देशभरातील ८५ हजारांहून अधिक वाहनचालकांकडे वार्षिक फास्टॅग आहेत. नव्या योजनेनुसार पथकर नाक्यापासून २० किमीच्या परीघात राहणाऱ्या वाहनचालकांना विशेष पासची सुविधा मिळणार आहे.
नगरपालिका किंवा शहराच्या हद्दीबाहेरील पथकर नाक्यांसाठी १५०० रुपयांत वार्षिक पास मिळणार आहे. तसेच नगरपालिका किंवा शहराच्या हद्दीत असणाऱ्या पथकर नाक्यांसाठी ३००० रुपयांत वार्षिक पास मिळणार आहे.
येत्या रविवारपासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून ही सुविधा लागू होणार आहे. बिगरव्यावसायिक वाहनधारकांनाच या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. सध्या उपलब्ध असलेला वार्षिक पास किंवा स्थानिक सवलतीचा पास यापैकी एकच पास वाहनधारकांना मिळू शकतो.