

मुंबई: रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्सने बुधवारी शेअर बाजारात दणक्यात पदार्पण केले आहे. बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी हा शेअर १,३५८ रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओमध्ये प्राईस बँड १,११९ रुपये होता. म्हणजेच गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी २१ टक्क्यांचा लिस्टिंग फायदा मिळाला आहे. गुंतवणूकदारांना प्रतिशेअर २३९ रुपयांचा नफा झाला आहे.
यानिमित्ताने आयोजित दिमाखदार सोहळ्याला रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी, ईशा अंबानी यांच्यासह अंबानी कुटुंबातील इतर सदस्य सहभागी झाले होते. अंबानी कुटुंबातील नव्या पिढीतील सदस्यही यावेळी उपस्थित होते.
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओबद्दल गुंतवणूकदारांनी प्रचंड उत्सुकता दाखवली होती. त्याचाच प्रत्यय लिस्टिंगच्या दिवशीही पाहायला मिळाला. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या ३०,२१३ कोटी रुपयांच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आयपीओ एकूण २२.१९ पट सबस्क्राईब झाला होता.
या आयपीओसाठी १.४ कोटीहून अधिक अर्ज आले होते. तर, एकूण ४.९ लाख कोटी रुपयांहून अधिकच्या बोली लागल्या होत्या. अर्जांची संख्या आणि बोलीची एकूण रक्कम या दोन्ही बाबतीत जिओ प्लॅटफॉर्म्सने भारतीय भांडवली बाजारात नवा इतिहास रचला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्स यांचे एकत्रित बाजारमूल्य २८.७ लाख कोटी रुपये झाले. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या भागधारकांची संख्याही देशात सर्वाधिक आहे. कंपनीचे एकूण ७९.८ लाख भागधारक आहेत. बाजार भांडवलाच्या दृष्टीने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्स या देशातील अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक मूल्यवान सूचिबद्ध कंपन्या बनल्या आहेत.
रिलायन्स नंबर एक, टाटा नंबर दोनवर
शेअर बाजारात जिओ प्लॅटफॉर्म्सने केलेल्या दमदार पदार्पणामुळे देशातील सर्वाधिक मूल्यवान उद्योगसमूहांच्या क्रमवारीत मोठा बदल झाला. बुधवारी जिओचा समभाग १,३५८ रुपयांवर सूचीबद्ध होताच रिलायन्स समूहाने टाटा समूहाला मागे टाकत देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहाचे स्थान पटकावले.
रिलायन्स समूहातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल २८.९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. टाटा समूह २५.६ लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या, तर अदाणी समूह १६.६ लाख कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
मुकेश अंबानी झाले भावुक
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या लिस्टिंग सोहळ्यात ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी भावुक झाल्याचे दिसून आले. अनंत आणि ईशा अंबानी यांचे मनोगत ऐकताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले.
अनेक वर्षांपूर्वी सर्वसामान्य भारतीयांनी रिलायन्सवर जो विश्वास दाखवला होता, तोच विश्वास आज जिओच्या बाबतीतही पाहायला मिळत आहे.
- ईशा अंबानी, रिलायन्स रिटेल व्हेंचरच्या कार्यकारी संचालक
जगातील महान तंत्रज्ञान कंपन्यांची गणना होईल, त्या दिवशी त्यापैकी एक कंपनी भारतातील असेल आणि त्या कंपनीचे नाव जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड असेल, हे माझे स्वप्न आहे.
- आकाश अंबानी, जिओ प्लॅटफॉर्म्सचे एमडी