मुंबई : गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात एप्रिलमध्ये झालेल्या टेक्नो म्युझिक कॉन्सर्टदरम्यान दोन एमबीए विद्यार्थ्यांचा एमडीएमए (एक्स्टसी) सेवनामुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणात अमेरिकेतून एक्स्टसी गोळ्यांचा पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. फ्लोरिडा (अमेरिका) येथून पाठविण्यात आलेल्या पार्सलद्वारे ड्रग्ज मुंबईत आणण्यात आले, त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नेटवर्क वापरण्यात आले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे आयोजकांनी दुर्लक्ष केले, असा दावा वनराई पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या ३,५०० पानी आरोपपत्रातून केला आहे.
आरोपपत्रानुसार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील Hot Miami Styles Inc. या ऑनलाइन कंपनीमार्फत एक्स्टसी गोळ्यांचे पार्सल उल्हासनगर येथील दीपेश हेमवानी (२३) याच्या पत्त्यावर पाठविण्यात आले होते. या पार्सलमध्ये कपड्यांच्या नावाखाली एमडीएमए गोळ्या लपविण्यात आल्याचा आरोप आहे. पुढे हा साठा मुंबईतील ड्रग्ज पुरवठादारांकडे पोहोचविण्यात आला आणि नेस्कोतील टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्ये त्याची विक्री करण्यात आली. तपासात असे दिसून आले आहे की, काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून कॉन्सर्टमध्ये एक्स्टसी गोळ्या उपलब्ध असल्याचा प्रचार केला होता. इच्छुक विद्यार्थ्यांकडून आगाऊ पैसे गोळा करून ड्रग्जची ऑर्डर देण्यात येत होती. त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोपींकडून गोळ्यांचा पुरवठा करण्यात येत होता.
या संपूर्ण व्यवहाराचे पुरावे पोलिसांना व्हॉट्सअॅप चॅट, मोबाईल डेटा आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासातून मिळाल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. आरोपपत्रात सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटीचाही उल्लेख आहे. कार्यक्रमादरम्यान काही सुरक्षा रक्षकांनी ड्रग्जची विक्री आणि सेवन सुरू असल्याची माहिती आयोजकांना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने कार्यक्रमात ड्रग्जचा मुक्तपणे वापर सुरू राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही आरोपींना कार्यक्रमस्थळी सहज प्रवेश मिळावा यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संगनमत केल्याचाही संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी आयुष साहित्या, महेश उर्फ मार्क खेमलानी, दीपेश हेमवानी यांच्यासह ड्रग्ज पुरवठा साखळीतील इतर आरोपींचा त्यात समावेश आहे. काही परदेशी संशयितांचा शोध अद्याप सुरू असून, त्यांच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ११ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या कॉन्सर्टनंतर दक्षिण मुंबईतील दोन एमबीए विद्यार्थ्यांचा एमडीएमए सेवनामुळे मृत्यू झाला होता, तर आणखी एका विद्यार्थिनीवर उपचार करून तिचा जीव वाचविण्यात आला. फॉरेन्सिक आणि विषतपासणी अहवालात मृतांच्या शरीरात एमडीएमए आढळल्याची पुष्टी झाली आहे.
३,५०० पानी आरोपपत्रात १०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, व्हॉट्सअॅप चॅट, कुरिअरची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांचे तपशील आणि फॉरेन्सिक अहवालांचा समावेश करण्यात आला आहे. या पुराव्यांच्या आधारे ड्रग्ज पुरवठ्याची संपूर्ण साखळी उघडकीस आणल्याचा दावा वनराई पोलिसांनी केला आहे.