मुंबई

NCP merger news | दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्‍या चर्चेला तूर्तास स्वल्पविराम

NCP merger news |सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार पक्षाचे नेतृत्व

पुढारी वृत्तसेवा

NCP merger news |

नवी दिल्‍ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात रंगलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर स्वल्पविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार नाही, हे आता स्पष्ट झाल्‍याचे वृत्त 'पुढारी न्‍यूज'ने दिले अहे. तसेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार कायम राहणार आहेत.

विलीनीकरणाच्या चर्चांना तूर्तास स्वल्पविराम

सुनेत्रा पवार यांच्या आज होणार्‍या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्र येणार आणि पक्षाकडून 'ग्रीन सिग्नल' मिळणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, दिल्लीतील बैठकांनंतर हे स्पष्ट झाले आहे की, सध्यातरी एकत्रीकरणाच्या संदर्भात कोणतीही हालचाल नाही. रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांचीही दिल्लीत चर्चा झाली, मात्र विलीनीकरणाचा विषय सध्यातरी बाजूला ठेवण्यात आला आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार पक्षाचे नेतृत्व

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आता स्वतंत्रपणे आपली वाटचाल अधिक मजबूत करताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहतील.फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.या संदर्भातील अंतिम निर्णय मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

पक्षांतर्गत नेत्यांचा नेमका सूर काय?

"कुटुंब म्हणून तुम्ही एकत्र राहा, त्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र, पक्षाच्या विलीनीकरणाचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा," असा स्पष्ट संदेश अजित पवार गटातील नेत्यांनी नेतृत्वाला दिला होता. पक्ष कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या या भूमिकेमुळेच विलीनीकरणाचा विचार सध्या थांबवण्यात आल्याचे समजते. महत्त्वाची बाब: या सर्व घडामोडी पूर्णपणे पक्षांतर्गत असून, शरद पवार यांच्या पक्षाचा या प्रक्रियेत कोणताही संबंध असणार नाही, हे देखील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT