

ठाणे : येत्या 12 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्वाची माहिती उघड करणार आहेत तर दुसरीकडे पक्षात महत्वाचे स्थान असलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र विलीनीकरणाच्या चर्चेत मी कुठेच नव्हतो,तसेच यासंदर्भात मला काहीच कल्पना देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क आता लावले जात आहेत.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागे कोणत्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढू नका, असे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरण संदर्भात त्यांना विचारले असता याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकाही बैठकीमध्ये मला सहभागी करून घेण्यात आलेले नव्हते. त्यामुळे याबाबत मला काहीच माहिती नसल्याने यावर मी काहीच भाष्य करू शकत नाही. मी विलीनीकरणाच्या कोणत्याच बैठकीत नसेन त्यामुळे मला विलीनीकरणा संदर्भात काहीच माहिती नसेल, हे माझे वक्तव्य स्पष्टपणे प्रसार माध्यमांवर दाखवा, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क आता लावले जात आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या या भेटीमुळे ठाण्यात अनेक राजकीय चर्चा रंगल्या होत्या. मात्र या भेटीसंदर्भात कोणत्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढू नये तर ही भेट केवळ विकासकामे आणि निधीबाबत असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या कामामुळे उपमुख्यमंत्री हे व्यस्त होते. माझ्या मतदार संघातील अनेक कामे ही प्रलंबित असल्याने यासाठी ही केवळ भेट असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.