NCP Merger Pudhari
मुंबई

NCP Merger: राष्ट्रवादी विलीनीकरणाचा फॉर्म्युला गुलदस्त्यातच; ‘नेमकं कोण कोणात विलीन होणार होतं?

घड्याळ चिन्हावर उमेदवार, पण सत्ता-समीकरणावर मौन; फडणवीसांच्या भूमिकेमुळे पवार गट अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दिलीप सपाटे

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करण्याचा निर्णय अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता, असा दावा शरद पवारांसह त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते करीत असले तरी या बैठकीत विलीनीकरणाचा कोणता फॉर्म्युला ठरला होता, याबाबत मात्र मौन आहे.

शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार होती की, अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात विलीन होणार होती याबाबत स्पष्टता नाही. शिवाय शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत जाणार होता की अजित पवार हे सत्तेतून बाहेर पडणार होते यावरही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बोलायला तयार नाहीत.

अजित पवार यांच्यासोबत 17 जानेवारीला झालेल्या बैठकीचा दाखला देत शरद पवार गटाचे नेते 12 फेब्रुवारीला विलीनीकरण होणार होते, असे शपथेवर सांगत आहेत. हा दावा अजित पवार गटाचे नेते फेटाळून लावत आहेत. त्यावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. पण या विलीनीकरणाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात आहे. 12 तारखेला कोणत्या पद्धतीने विलीनीकरण होणार होते, हे पवार गटाच्या नेत्यांनी सांगितलेले नाही.

ज्याअर्थी जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचे चिन्ह शरद पवार गटाने स्वीकारले आहे, त्याअर्थी शरद पवार यांचा पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाला असता. कारण पक्षाचे मुख्य चिन्ह घड्याळ हे अजित पवारांच्या पक्षाकडेच आहे. शरद पवार गटाचे नेते विलीनीकरण होणार होते म्हणून आम्ही आमचे उमेदवार घड्याळ चिन्हावर उभे केले असे सांगत आहेत. असे असेल तर आपली सेक्युलर विचारधारा सोडून भाजप प्रणीत सरकारमध्ये सामील होण्याची भूमिका शरद पवारांना वैचारिकदृष्ट्या मान्य केली होती का? त्यांना सरकारमध्ये घेण्यास भाजपचा होकार होता का? तसे नसेल तर अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार होते का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलीनीकरणाबाबत अजित पवारांनी आपल्याशी कोणतीही चर्चा केली नव्हती, असे स्पष्ट केले आहे. शरद पवार यांच्या पक्षाला सत्तेत घ्यायचे तर त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संमती आवश्यक आहे.अन्य कोणता फॉर्म्युला ठरला होता का हे स्पष्ट करण्याची जबाबदारी ही शरद पवार गटाकडेच येते.

भाजपसोबत यायची तयारी आहे का? : सुनील तटकरे

कराड ः दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार होते, हे स्पष्ट केले पाहिजे. आम्ही देशाचे आणि राज्याचे व्यापक हित पाहून एनडीएसोबत जाण्याचा निर्णय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतला होता आणि ही भूमिका पुढे नेणे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळेच भाजप प्रणीत एनडीएसोबत येण्याची अनुकूलता असणाऱ्यांनी निर्णय करावा, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे कराडमध्ये म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT