मुंबई : नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, अनेक भाविक नऊ दिवस उपवास करत आहेत. धार्मिक श्रद्धेपोटी चप्पल न घालता अनवाणी चालण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. देवीच्या दर्शनासाठी किंवा नवसपूर्तीसाठी मैलोनमैल अनवाणी चालणारे भाविकही आहेत. मात्र ऑक्टोबरचा वाढता उकाडा, त्यात उपवास आणि अनवाणी चालणे यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. पुरेसे पाणी न घेतल्यास डिहायड्रेशनचा धोका, तर उन्हाने तापलेल्या रस्त्यावर अनवाणी चालल्यास पाय भाजणे, फोड येणे किंवा जखम होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नवरात्रीत श्रद्धेसोबत काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
उपवासात पाणी कमी पडू देऊ नका
उकाड्यात घामावाटे शरीरातील पाणी आणि क्षार मोठ्या प्रमाणात कमी होतात. त्यात उपवासामुळे आहाराचे प्रमाण कमी झाल्यास शरीराला ऊर्जा व पोषण मिळत नाही. दिवसभर केवळ चहा-कॉफीवर किंवा अत्यल्प पाण्यावर राहणे टाळावे. तहान लागण्याची वाट न पाहता ठराविक अंतराने पाणी प्यावे. ताक, नारळपाणी, दूध, दही यांसारख्या द्रवपदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश करावा.
अपोलो स्पेक्ट्रा, मुंबई येथील औषधतज्ज्ञ डॉ. छाया वजा म्हणाल्या, “उपवास म्हणजे पूर्णपणे उपाशी राहणे नव्हे. शरीराला आवश्यक पाणी, ऊर्जा आणि पोषक घटक मिळणे गरजेचे आहे. ऑक्टोबरच्या उकाड्यात उपवासासोबत लांब अंतर अनवाणी चालल्यास डिहायड्रेशन, अशक्तपणा आणि पायाच्या दुखापतीचा धोका वाढू शकतो. विशेषतः मधुमेही आणि ज्येष्ठांनी अधिक काळजी घ्यावी. चक्कर, अशक्तपणा, जास्त घाम येणे, धडधड किंवा अस्वस्थ वाटल्यास उपवास आणि चालणे थांबवून वैद्यकीय सल्ला घ्यावा.”
मधुमेहींनी अनवाणी चालणे टाळावे
मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये पायांच्या संवेदना कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे पायाला उष्णतेची झळ बसली किंवा दुखापत झाली तरी ती जाणवेलच असे नाही. छोटी जखमही दुर्लक्षित राहिल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मधुमेहींनी शक्यतो अनवाणी चालणे टाळावे आणि दररोज पायांची तपासणी करावी.
फराळातही संतुलन आवश्यक
एआयएमएस हॉस्पिटल, सल्लागार आहारतज्ज्ञ प्रियांका पाटील म्हणाल्या, “उपवासाच्या काळात दिवसभर काहीही न खाता रात्री एकाच वेळी मोठ्या प्रमाणात फराळ करण्याऐवजी थोड्या-थोड्या अंतराने संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. फळे, दूध, दही, ताक, नारळपाणी, शेंगदाणे, राजगिरा आणि भगर यांचा योग्य प्रमाणात समावेश करता येतो.
साबुदाणा वडा, तळलेले बटाटे, फराळी चिवडा यांसारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास कॅलरी आणि तेलाचे प्रमाण वाढते. मधुमेहींनी तर उपवासाचा आहार डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवावा.” बाहेरचे फराळी पदार्थ खाताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. ऑक्टोबरच्या उकाड्यात अन्नपदार्थ लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे ताजे आणि स्वच्छ पदार्थच खावेत.
औषधे-इन्सुलिन स्वतःहून बदलू नका
मधुमेही व्यक्तींनी दीर्घकाळ उपाशी राहिल्यास रक्तातील साखर कमी होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे औषधे किंवा इन्सुलिनचा डोस स्वतःहून कमी-जास्त करू नये. उपवास करणार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे, आहार आणि रक्तातील साखरेचे नियोजन करावे.
ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा
चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, जास्त तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, डोकेदुखी, अशक्तपणा, उलट्या, धडधड किंवा बेशुद्ध पडण्यासारखी लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष करू नये. अशा वेळी उपवास थांबवून द्रवपदार्थ घ्यावेत आणि गरज असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
नवस श्रद्धेचा; आरोग्याची काळजीही महत्त्वाची!
ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, स्तनदा माता, मधुमेही तसेच रक्तदाब, मूत्रपिंड किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी उपवास आणि अनवाणी चालण्याबाबत विशेष काळजी घ्यावी. श्रद्धा जपत असताना शरीराच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
गरम रस्त्यावर अनवाणी चालणे धोकादायक
भर उन्हात डांबरी, सिमेंटचे तसेच फरसबंदीचे रस्ते मोठ्या प्रमाणात तापतात. अशा रस्त्यावरून बराच वेळ अनवाणी चालल्यास पायाच्या तळव्यांना जळजळ, लालसरपणा, फोड किंवा भाजल्यासारखी जखम होऊ शकते. शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी अनवाणी चालावे. भर दुपारी लांब अंतर अनवाणी चालणे टाळावे. पायाला फोड, जखम किंवा लालसरपणा दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.