Raigad Road Conditions : ताम्हिणी मार्गावर औद्योगिक-पर्यटन वाहतुकीचा वाढता ताण

३५ किलोमीटरचा मार्ग अरुंद; निजामपूर बायपासला लोकप्रतिनिधींचा समन्वय हवा
Raigad Road Conditions
Raigad Road Conditionspudhari photo
Published on: 
Updated on: 

माणगाव : कमलाकर होवाळ

आंतरराष्ट्रीय माणगाव, निजामपूर ते पुणे जिल्ह्यातील आदरवाडीपर्यंत जाणारा महत्त्वाचा मार्ग आजही अरुंद रस्त्याच्या कोंडीत अडकला आहे. माणगावपासून निजामपूर पर्यंत सुमारे १० किलो मीटर, निजामपूर ते पुढे ताम्हिणी घाटाच्या दिशेने सुमारे ३५ किलोमीटरचा मार्ग अनेक ठिकाणी अरुंद आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे, खचलेल्या साईड पट्ट्या आणि अपुऱ्या रुंदी मुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः निजामपूर बाजार पेठेतील अरुंद रस्ता वाहतुकी साठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे चौर्‍या ऐंशी गाव खोऱ्यांची बाजारपेठ असलेल्या निजामपूरचा श्वासच कोंडला आहे. पर्यटन उद्योगामुळे कोकणच्या विकासाला नवे बळ मिळेल या दृष्टिकोनातून या रस्त्याची निर्मिती झाली मात्र कोकणच्या विकासाची वाट चार दशका नंतरही अरुंदच राहिली आहे.

Raigad Road Conditions
Raigad Beach Accident | दिवेआगर दुर्घटना : नेमकी चूक कुठे झाली?

ताम्हिणी मार्गावर औद्योगिक-पर्यटन वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता रुंदीकरण महत्वाची आहे, तसेच या मार्गसह निजामपूर शहराला बायपासची गरज असून यासाठी पुणे व रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा समन्वय महत्त्वाचा आहे. त्यातूनच आंतरराष्ट्रीय माणगाव पुणे अरुंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लागून 'विकासाची' कोंडी सुटेल. असा विश्वास नागरिकांना वाटत आहे.

निजामपूर हे केवळ गाव नसून परिसरातील ८४ गावखोऱ्या साठी प्रमुख बाजारपेठ आणि शैक्षणिक केंद्र आहे. बाजारपेठ, भाजीपाला खरेदी, विक्री, शाळा, महाविद्यालये, आयटीआय, मराठी व इंग्रजी माध्यमाचे शिक्षण, उच्च माध्यमिक विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, महसूल सजा, मंडळ अधिकारी कार्यालय आणि पोलीस दुरक्षेत्र यामुळे दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे बाजार पेठेतील अरुंद रस्त्यावर पादचारी, दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने आणि औद्योगिक वाहतूक यांचा एकत्रित ताण निर्माण होतो.

यातच विळे, भागाड औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक ही समस्या अधिक गंभीर करीत आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाहनांची ये-जा, स्थानिक बाजारपेठेतील गर्दी आणि पुणे, कोकण मार्गावरील पर्यटकांची वाढती संख्या यामुळे निजामपूर परिसरात वाहतूक कोंडीचे प्रसंग वारंवार निर्माण होत आहेत. अरुंद रस्त्यामुळे वाहनांना पुरेशी जागा मिळत नसल्याने अपघातांचा धोकाही वाढला आहे.

दुसरीकडे दिघी बंदराकडून माणगाव मार्गे निजामपूर, विळे, भागाड आणि पुढे ताम्हिणी घाटाच्या दिशेने जाणारा मार्ग औद्योगिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे. दिघी बंदर ते माणगाव पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर माणगाव पुढील मार्गाची क्षमता आणि प्रत्यक्ष वाहतुकीतील तफावत अधिक ठळकपणे जाणवू लागली आहे. एका बाजूला मोठ्या क्षमतेचा मार्ग आणि दुसऱ्या बाजूला अरुंद रस्ता अशी स्थिती निर्माण झाल्याने वाहतुकीचा ताण निजामपूर आणि परिसरावर येत आहे.

Raigad Road Conditions
Raigad News : रस्ता नसल्याने मरणयातना; महिला झोळीतच दगावली!

निजामपूर शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचा मोठा भार कमी करण्यासाठी स्वतंत्र बायपास रस्ता हा आता केवळ मागणीचा विषय न राहता भविष्यातील नियोजनाचा भाग होणे गरजेचे आहे. शहरातील बाजार पेठ, शैक्षणिक संस्था आणि प्रशासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या स्थानिक नागरिकांची वाहतूक सुरक्षित ठेवण्या साठी शहरांतर्गत रस्ता आणि बाहेरील औद्योगिक, अवजड व पर्यटक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग अशी दुहेरी व्यवस्था आवश्यक आहे. निजामपूर परिसरातील नागरिकांनी यापूर्वी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री भरतशेठ गोगावले तसेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.

रस्त्याचे रुंदीकरण आणि बायपास या दोन्ही मागण्यांवर ठोस निर्णय व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. एमएसआरडीसी कडून केंद्राच्या अखत्यारित राष्ट्रीय महामार्गा कडे वर्ग करण्याची मागणी सदर मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित असल्याचे सांगण्यात येते. निधी अभावी रुंदीकरणाची कामे प्रलंबित असल्याने हा मार्ग केंद्राच्या अखत्यारित राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यात समाविष्ट करण्याची मागणी नागरिका कडून पुढे आली आहे. केंद्राच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास दीर्घकालीन नियोजनातून रस्त्याचे रुंदीकरण, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापन शक्य होईल, अशी नागरिकांची भूमिका आहे.

विळे–भागाड औद्योगिक क्षेत्रातील हालचाली वाढत असताना भविष्यातील औद्योगिक प्रकल्प आणि प्रस्तावित दिल्ली–मुंबई औद्योगिक कॉरिडॉरशी संबंधित विकासामुळे या पट्ट्यात वाहतुकीची गरज आणखी वाढण्याची शक्यता आहे. उद्योग येतील, रोजगाराच्या संधी निर्माण होतील, मालवाहतूक वाढेल; मात्र त्याच वेळी सक्षम रस्ते आणि वाहतूक व्यवस्था उभी केली नाही, तर विकासाचा फायदा घेण्याऐवजी स्थानिक नागरिकांनाच वाहतूक कोंडी आणि अपघातांचा त्रास सहन करावा लागेल. पर्यटना साठीही महत्त्वाचा मार्ग पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ताम्हिणी घाटाचा मार्ग महत्त्वाचा आहे.

  • निजामपूरचा प्रश्न हा केवळ एका शहरातील रस्त्याचा प्रश्न नाही; तो ८४ गाव खोऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी, शिक्षणाशी, व्यापाराशी, उद्योगाशी आणि भविष्यातील विकासाशी जोडलेला प्रश्न आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे हटविणे, खचलेल्या साईड पट्ट्या दुरुस्त करणे यांसारख्या तातडीच्या उपायांसोबतच माणगाव–निजामपूर–विळे–ताम्हिणी मार्गाचे शास्त्रोक्त रुंदीकरण आणि निजामपूर शहरासाठी स्वतंत्र बायपास याबाबत शासनाने दीर्घकालीन निर्णय घेणे आवश्यक आहे. निजामपूरच्या विकासाला अरुंद रस्त्याची कोंडी अडथळा ठरू नये, यासाठी आता आश्वासनां पेक्षा प्रत्यक्ष निर्णय आणि कामाला सुरुवात होण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news