नवी मुंबई: नवी मुंबई शहरात आपण पाणीकपात होऊ देणार नाही. पाणी कपात नवी मुंबईत करणे म्हणजे नवी मुंबई करांचा अपमान आहे.
पाण्याचा गैरवापर थांबवला, तर नवी मुंबईकरांना पाणी कपातील सामोरे जावे लागणार नाही. येथील जनता सुज्ञ असून त्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशीत केले.
नवी मुंबई पालिका व परिवहन उपक्रमातील कंत्राटी कामगारांना ७ हजार ५०० रुपयांचा विशेष सानुग्रह लाभ आणि दिवाळीनिमित्त सरसकट ४५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल श्रमिक सेनेच्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात शनिवारी वचनपूर्ती कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांवर कोणतीही करवाढ न लादता कामगारांना चांगले वेतन आणि जनतेला दर्जेदार नागरी सुविधा देण्याची भूमिका कायम राहील. पुढील २० वर्षे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ होऊ देणार नाही. नवी मुंबईतील कामगारांचे कल्याण आणि या शहराचा विकास या दोन्ही गोष्टींना समान प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी वाशीत दिली.
यावेळी श्रमिक सेना अध्यक्ष संजीव नाईक, उपाध्यक्ष संदीप नाईक, महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृहनेते सागर नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, सरचिटणीस चरण जाधव, नगरसेवक सूरज पाटील उपस्थित होते.
कामगारांच्या स्वप्नांची पूर्तता
४५ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानामुळे कामगारांची दिवाळी आजपासूनच सुरू झाली आहे. ही वेतनवाढ कामगारांच्या स्वप्नांची पूर्तता असून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणारी ठरेल, असे महापौर सुजाता पाटील यांनी यावेळी सांगितले.